scorecardresearch

पंतप्रधान लिखित पुस्तक विद्यार्थ्यांना वाटा! प्रशासनाच्या शाळांना सूचना

परीक्षा, तणावाचा सामना याला तोंड कसे द्यावे यावर आधारित असलेले परीक्षा पे चर्चा हे पुस्तक मोदी यांनी लिहिले आहे.

पंतप्रधान लिखित पुस्तक विद्यार्थ्यांना वाटा! प्रशासनाच्या शाळांना सूचना
पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित परीक्षा पे चर्चा हे पुस्तक

मुंबई : परीक्षा पे चर्चाचे शाळांमध्ये थेट प्रक्षेपण, आंतरराष्ट्रीय योगदिन – मोदीजींनी वेधले जगाचे लक्ष, चुलीतील धुराच्या त्रासातून मुक्त महिला- मोदींचा संवेदनशील निर्णय अशा विषयांवर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित परीक्षा पे चर्चा हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाटण्याची सूचनाही शाळांना देण्यात आली आहे.

परीक्षा पे चर्चा येत्या शुक्रवारी (२७ जानेवारी) होणार आहे. त्यानिमित्ताने इतरही अनेक उपक्रम शाळांमध्ये आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा पे चर्चा या उपक्रमाचे हे सहावे पर्व आहे. हा उपक्रम, परीक्षा, तणावाचा सामना याला तोंड कसे द्यावे यावर आधारित असलेले परीक्षा पे चर्चा हे पुस्तक मोदी यांनी लिहिले आहे. दिल्लीतील एका प्रकाशनाने हिंदी, इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली आहे. त्याच्या मराठी भाषांतराचे प्रकाशन नुकतेच राजभवन येथे झाले. हे पुस्तकही विद्यार्थ्यांना वाटण्यात यावे अशा सूचनाही काही जिल्ह्यांमध्ये अधिकाऱ्यांनी शिक्षकांना दिल्या आहेत. काही ठिकाणी थेट दिल्लीतील प्रकाशकांकडून पुस्तक मागवून घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या पुस्तकाची शोधाशोध शिक्षकांनी सुरू केली आहे. मात्र, त्याचा खर्च कुणी, कसा करावा याबाबत मात्र काहीही सूचना देण्यात आलेली नाही, अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली. अधिकाऱ्यांनी शिक्षक, मुख्याध्यापकांच्या गटांवर पुस्तक खरेदी करून वाटण्याची सूचना दिली आहे. अनेक स्थानिक वितरकांकडे हे पुस्तक नाही. दिल्लीतील प्रकाशनाची पुस्तके इंग्रजी, हिंदीत आहेत असे असताना विद्यार्थ्यांना पुस्तक कसे वाटावे असा प्रश्न एका मुख्याध्यापकांनी उपस्थित केला. पुस्तक वाटण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, त्याचे इतर काहीच तपशील सांगण्यात आलेले नाहीत, असेही मुख्याध्यापकांनी सांगितले.

मराठी पुस्तके उपलब्धच नाहीत

परीक्षा पे चर्चाच्या मराठी भाषांतरीत आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले असले तरी अद्यापही अनेक पुस्तक वितरक, दुकानांमध्ये ते पुस्तक उपलब्ध नाही. त्यामुळेही शिक्षक गोंधळले आहेत.

चित्रकला स्पर्धेच्या विषयांवरून चर्चा

सध्या अकरावी, बारावीतील विद्यार्थी येत्या निवडणुकीत मतदानासाठी पात्र ठरू शकतील. पक्षाचे नाव नसले तरी त्याच्या प्रमुख नेत्यांचे छायाचित्र वापरून होणारा उपक्रम हा भावी मतदार घडवण्याचा प्रकार आहे, अशा प्रतिक्रिया चित्रकला स्पर्धेबाबत उमटल्या आहेत.  ‘संवेदनशील मोदींचा संवेदनशील निर्णय३, ‘मोदीजींने वेधले जगाचे लक्ष’ अशा विषयांची चित्रे कशी काढायची, अशाही चर्चा चित्रकला स्पर्धेच्या विषयांवरून रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 06:41 IST

संबंधित बातम्या