मुंबई : महानगर टेलिफोन निगम लि. म्हणजेच एमटीएनएलमध्ये मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करून ही सरकारी कंपनी डबघाईला आलेली असतानाच आता या कंपनीच्या मालकीच्या ऐवजाची चोरी होत असल्याची भीती काही कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे. दूरध्वनीच्या जाळ्यासाठी जमिनीत टाकलेल्या कॉपर केबलची परस्पर चोरी करून भंगारात विक्री करून एमटीएनएलचे माजी कर्मचारी असलेले खासगी कंत्राटदार मलिदा कमावत असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

एमटीएनएल ही गेल्या तीन दशकांतील मुंबई आणि परिसरातील एकमेव टेलिफोन सेवा देणारी कंपनी होती. २००५-२०१० पर्यंत एमटीएनएलचा दबदबा होता. आता अन्य कंपन्यांना चांगले दिवस आले आहेत. एमटीएनएलची खरी संपत्ती होती ती भूमिगत कॉपर केबल्स. करोडो रुपयांची ही संपत्ती सध्या परस्पर चोरीला जात असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. १९९०च्या दशकात एमटीएनएलमध्ये केबल टाकण्याबाबत घोटाळा झाला होता. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बदली झाली होती. अनेकांची खातेनिहाय चौकशीदेखील झाली होती.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
Ola Uber Pune
ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

लँडलाइन ग्राहकसंख्या रोडावल्यामुळे आणि सध्या फायबर केबलचे तंत्रज्ञान आल्यामुळे पूर्वीच्या कॉपर केबल्स वापराविना पडून आहेत. व्यवस्थापनाकडून या केबल्स काढून घेणे अभिप्रेत होते. परंतु तसे न झाल्याने करोडो रुपयांच्या कॉपर केबल्स अजूनही काढण्यात आलेल्या नाहीत. सध्या एमटीएनएलमध्ये कंत्राटराज असल्यामुळे आणि या कंत्राटात काम करणारे अनेक जण हे एमटीएनएलचेच निवृत्त कर्मचारी -अधिकारी असल्यामुळे त्यांना या केबलची किंमत माहिती असून त्यातूनच केबलची परस्पर चोरी होत असल्याचा आरोप केला जात आहे. सध्याचे कंत्राटदार टेलिकॉम कंपनीचेच माजी अधिकारी असल्यामुळे त्यांनी केबल प्राप्तीतून होणारा धनलाभ लक्षात घेऊनच कंत्राटे घेतल्याचे एमटीएनएलचे कर्मचारी खासगीत सांगतात.

सध्या मुंबई-नवी मुंबईमध्ये एमटीएनएलच्या कॉपर केबल्स परस्पर काढून विकण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची चर्चा जोरात आहे. यात कंत्राटदार आणि कार्यरत कर्मचारी अधिकाऱ्यांचे ‘साटेलोटे’ असल्यामुळे त्याची बाहेर वाच्यता होत नाही. कुर्ला येथील भंगार बाजारात सध्या एमटीएनएलच्या कॉपर केबलचा बोलबाला असल्याचे सांगितले जाते. याबाबत एमटीएनएलचे चरई विभागाचे महाव्यवस्थापक एस पी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विभागीय उपमहाव्यवस्थापक द्राडे यांच्याकडून माहिती घेण्यास सांगितले. कॉपर केबलची परस्पर चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्या तर त्याची दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला जातो, असे त्यांनी सांगितले. तशी माहिती असल्यास आपल्याला ती द्यावी, असेही द्राडे यांनी सांगितले.