मुंबई : येत्या सप्टेंबर २०२६ मध्ये गणेशोत्सव असून मूर्तिकारांना आतापासूनच गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) साकारलेल्या गणेशमूर्तीवरील बंदी शिथिल करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली मुदत येत्या मार्च महिन्यात संपत असून सप्टेंबरमधील गणेशोत्सव पर्यावरणस्नेही पद्धतीनेच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे मूर्तिकारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव पर्यावरणस्नेही मूर्तींबाबतच्या न्यायालयीन खटल्यांमुळे गाजला. गेल्यावर्षी पीओपीच्या मूर्तींवरील सरसकट बंदी शिथिल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्णयाच्या वेळी सहा फुटांपेक्षा उंच पीओपी मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यास परवानगी दिली होती. परंतु, हे आदेश केवळ २०२६ च्या माघी गणेशोत्सवापर्यंतच लागू असतील असे म्हटले होते. यावर्षीचा माघी गणेशोत्सव नुकताच पार पडला. या गणेशोत्सवातही उपनगरात मोठ्या पीओपीच्या मूर्ती होत्या. त्यांचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात होऊ शकले. मात्र आता येत्या भाद्रपदातील गणेशोत्सव कसा असणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

श्री गणेश मूर्तिकला समिती या संघटनेचे वसंत राजे यांनी याबाबत पालिका प्रशासनाला पत्र पाठवून यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना मंडप परवानगीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत राजे यांनी सांगितले की, दरवर्षी मूर्तिकारांना मंडप उभारण्यासाठी मे महिन्यापासून परवानगी दिली जाते. गेल्यावर्षी पीओपी मूर्ती बंदीची चर्चा सुरू होती.

पर्यावरणस्नेही शाडूच्या मातीच्या मूर्ती सुकण्यासाठी जास्त कालावधी लागत असल्यामुळे मूर्तिकारांना परवानगी देण्याची प्रक्रिया मार्च महिन्यापासूनच सुरू झाली होती. त्याबाबतचे परिपत्रक फेब्रुवारीमध्ये काढण्यात आले होते. आता न्यायालयाने दिलेली पीओपी मूर्तींसाठीची मुदत संपली असून यावेळी पर्यावरणस्नेही मूर्ती घडवाव्या लागणार आहेत. त्याकरीता आतापासूनच सुरूवात करावी लागणार असून पालिका प्रशासनाने आतापासूनच मंडप परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी राजे यांनी पत्रात केली आहे.

दरम्यान, याबाबत मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासन या विषयावर सकारात्मक विचार करीत असून यावर्षीही मूर्तिकारांना गेल्यावर्षीपेक्षा अधिक सोयी-सुविधा देण्यात येतील. यंदा गणेशोत्सव थोडा उशीरा आहे. गेल्यावर्षी मूर्तिकारांना शाडूची माती दिली होती. यंदाही शाडूची माती आणि पर्यावरणपूरक रंग देण्याचा विचार आहे.

गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात न्यायालायाने पीओपीच्या मूर्ती घडवण्यावर आणि विक्रीवर पूर्णतः बंदी घातल्यामुळे माघी गणेशोत्सवातील मूर्तींचे विसर्जन रखडले होते. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालायाने अखेर जुलै २०२५ मध्ये ही बंदी शिथिल करून पीओपीच्या उंच मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यास परवानगी दिल्यानंतर सहा महिन्यांनी माघी गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते.