गाठिया, फरसाणमुळे समुद्रपक्ष्यांचा जीव धोक्यात!

फरसाण, चिवडा असे पदार्थ खायला टाकले जात असून त्यामुळे या पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पर्यटकांकडून देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामुळे आरोग्याचा प्रश्न; वन्यजीव रक्षकाच्या तक्रारीनंतर कांदळवन विभागाला जाग

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर किंवा समुद्रातून जाणाऱ्या बोटींसोबत झेपावत उडणाऱ्या सीगलना खाद्य टाकण्याची पर्यटकांची हौस आता या पक्ष्यांच्या जीवावर बेतू लागली आहे. पर्यटकांकडून या पक्ष्यांना फरसाण, चिवडा असे पदार्थ खायला टाकले जात असून त्यामुळे या पक्ष्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील मानद वन्यजीवरक्षकाने याबाबत वनविभागाला पत्र पाठवल्यानंतर आता पर्यटकांना परावृत्त करण्यासाठी वनविभागाकडून मोहीम होती घेण्यात आली आहे.

मुंबईत हिवाळ्यादरम्यान स्थलांतर करणाऱ्या अनेक पक्ष्यांच्या प्रजाती बऱ्याचदा एप्रिल-मे महिन्यापर्यंत याठिकाणी वास्तव्यास असतात. त्यामध्ये बऱ्यापैकी प्रसिद्ध असणाऱ्या ‘सीगल’ पक्ष्यांच्या सुमारे चार प्रजाती मुंबईत पाहिल्या जातात. पल्लासचा कुरव (पल्लास गल), तपकिरी डोक्याचा कुरव (ब्राऊन-हेडेड गल), काळ्या डोक्याचा कुरव (ब्लॅक-हेडेड कुरव) आणि पातळ चोचीचा कुरव (सलेंडर-बिल्लेड गल) या प्रजाती मुंबईत स्थलांतर करतात. हिवाळी स्थलांतरानंतर हे पक्षी प्रजाजनासाठी पुन्हा आपल्या मायदेशी परतात. त्यामध्ये काळ्या डोक्याचा कुरव हा मोठय़ा संख्येने थव्यांमध्ये मुंबईचे किनारे आणि चौपाटय़ांवर सहज दिसतो. सामान्यत: मासे, किडे, खेकडे, कोलंबीसारख्या सागरी अपृष्ठवंशीय प्राण्यांचा त्यांच्या नैसर्गिक अन्नामध्ये समावेश असतो. मात्र चौपाटय़ांवर दिसणाऱ्या या पक्ष्यांच्या आकर्षणापोटी काही पर्यटक आणि रहिवाशी गाठय़ा, शेव, पापडी यांसारखे क्षाराचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ खाण्यासाठी टाकतात. या गोष्टीला हरकत दर्शवत मुंबईचे मानद वन्यजीवरक्षक पवन शर्मा यांनी कांदळवन कक्षाला पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेऊन कांदळवन कक्षाकडून कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. ‘मुळातच ‘गल’ हे स्थलांतरित पक्षी असल्याने त्यांनी नैसर्गिक अन्नाचे सेवन करणे अपेक्षित आहे. मात्र काही हौशी रहिवाशी आणि पर्यटक त्यांच्या आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ खाण्यासाठी देतात. याचा या पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो, असे शर्मा यांनी सांगितले.

‘सीगल’ पक्ष्यांनी मानवनिर्मिती पदार्थाचे सेवन केल्याने त्यांच्या लोकसंख्येत आणि स्थलांतरावर परिणाम झाल्याचे परदेशात झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. क्षाराचे प्रमाण अधिक असणाऱ्या पदार्थाच्या सेवनाने या पक्ष्यांच्या पचन क्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याची माहिती पक्षीतज्ज्ञ डॉ. रिना देव यांनी दिली. तसेच गाठिया, पापडी यांसारखे पदार्थ खाऊन पक्ष्यांच्या कॉलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते. आणि परतण्याच्या कालावधीत त्यांच्या उडण्याच्या वेगावर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गल’ पक्ष्यांना नागरिकांकडून  आरोग्यास हानिकारक असणारे पदार्थ त्यांना खाण्यासाठी दिले जातात. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यासाठी नरिमन पॉइंट, गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी जनजागृतीपर फलक लावण्यात येणार आहेत. तसेच रोज सकाळी कांदळवन संरक्षण विभागाचे कर्मचारी चौपाटय़ांवर गस्त घालतील.

– सीमा आडगावकर, मध्य-मुंबई वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन संरक्षण विभाग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Seabirds health in danger due to food provided by tourists