अनिश पाटील

मुंबई : भारतात कंपनी स्थापन करून तिचे मालक परदेशी दाखवून कोटय़वधी रुपयांचा कर चुकवण्याचा राजरोस प्रकार काही सनदी लेखापाल आणि कंपनी सेक्रेटरी करीत असल्याचे समोर आले आहे. अशा ‘बनावट’ कंपन्यांच्या ५६ चिनी मालकांचा शोध आर्थिक गुन्हे शाखेकडून होत असून या प्रकरणी ३९ गुन्हे दाखल झाले आहेत. कर चुकवण्यासाठी अथवा परदेशात बेकायदेशीर पैसा पाठवण्यासाठी या कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

 कंपनी निबंधक कार्यालयाने याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. याप्रकरणी फेब्रुवारी,२०२२ मध्ये प्रथम गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने ५६ चीनी नागरिक व १५६ भारतीय नागरिकांविरोधात ३९ गुन्हे दाखल केले होते, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (आर्थिक गन्हे) प्रवीण पडवळ यांनी दिली. आरोपींमध्ये सनदी लेखापाल व कंपनी सेक्रेटरींचा समावेश आहे. आरोपींनी भारतात बेकायदा कंपन्या स्थापन करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे.  या प्रकरणातील कंपन्यामध्ये किती बनावट कंपन्या आहेत, याबाबत आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. याप्रकरणांशी संबंधीत संशयितांची चौकशी करण्यात तसेच त्यांचे जबाब नोंदवणार आहेत. केंद्रीय यंत्रणाही याबाबत तपासणी करत आहेत.

प्रकार काय?

भारतीय नागरिक प्रथम स्वत:च्या नावावर कंपनीची स्थापन करायचे. त्यानंतर निबंधक कार्यालयाला अंधारात ठेवून बेकायदेशीर कंपनीची मालकी परदेशी नागरिकांकडे हस्तांतरीत करायचे. त्यात बहुतांश चीनी नागरीकांचा समावेश आहे.

कसे उघड झाले?

या कंपन्यांमध्ये बनावट संचालक नेमण्यात आले होते. पण याबाबत निबंधक कार्यालयाकडे कोणत्याही नोंदी नव्हत्या. अनेक वर्षे कंपन्या कागदोपत्री चालवल्यानंतर त्याचे समभाग हळूहळू करून परदेशी नागरिकांच्या नावावर झाल्याचे निबंधक कार्यालयाच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी याप्रकरणी तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला.

थोडी माहिती..

भारतात कंपनी स्थापन केल्यानंतर प्रथम गुरगाव येथे नोंदणी करणे सक्तीचे असते. त्यानंतर या कंपनीची नोंदणी स्थानिक कंपनी निबंधक कार्यालयात करण्यात येते. राज्यात मुंबई व पुणे येथे विभागीय कार्यालये आहेत. मुंबईत मंत्रालयात त्याचे कार्यालय आहे. पण काही सनदी अधिकारी स्वत: कंपन्या स्थापन करून हळूहळू त्यांचे समभाग परदेशी नागरिकांना हस्तांतरित करीत आहेत.