मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झालेल्या एका मेल गाडीत १५ तोळे सोन्याचे दागिने असलेली एक बॅग प्रवाशी विसरला होता. मात्र कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ तपास करुन तासाभरातच प्रवाशाला सोन्याचे दागिने परत मिळवून दिले. विशाखापट्टणम एक्स्प्रेसने रविवारी पहाटे मुंबईत दाखल झालेला प्रवासी त्याची एक बॅग गाडीत विसरून कल्याण रेल्वे स्थानकात उतरला. काही वेळाने त्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना ही बाब सांगितली. त्यांनी तत्काळ कुर्ला लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनसवर जाऊन संपूर्ण गाडी तपासून बॅग ताब्यात घेतली. त्या बॅगेत प्रवाशाचे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी तत्काळ त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून, खात्री करून, त्यांचे दागिने परत केले. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तासाभरातच दागिने परत मिळाले.



