मुंबई : पर्यटनासह अन्य कारणांसाठी परदेशात जाणारे नागरिक आणि शासकीय, खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना आता कोव्हिशिल्ड या करोना लशीची दुसरी मात्रा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनंतर घेता येणार आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत.‘कोव्हिशिल्ड’ची दुसरी मात्रा ८४ दिवसांनी घेता येते. परदेशात शिक्षण किंवा नोकरीसाठी जाणाऱ्या, ऑलिम्पिक खेळाडूंसाठी कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेची मर्यादा ८४ दिवसांऐवजी २८ दिवसांनी घेण्याची मुभा देण्यात आली होती.पर्यटनासह अन्य कामांनिमित्त परदेशात जाणाऱ्या नागरिकांची विशिष्ट दिवसांच्या मुदतीच्या अटीमुळे अडचण होत होती. तसेच आता र्निबध शिथिल केल्यानंतर शासकीय आणि खासगी आस्थापना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. तेथील कर्मचारी कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्यास मुभा देण्याची मागणी सातत्याने करीत होते. या मागणीची दखल घेत पालिकेने लसीकरणाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार पर्यटनासह अन्य काही कारणांसाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या आणि खासगी, शासकीय आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा २८ दिवसांनंतर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हिशिल्डला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्रावर कोव्हिशिल्ड लशीचा उल्लेख हा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पुरेसा असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

आस्थापनांमध्ये मुखपट्टीचा वापर न केल्यास २०० रुपये दंड

शासकीय, निमशासकीय आणि खासगी आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आणि त्यांना भेटण्यास येणाऱ्या अभ्यागतांना मुखपट्टीचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल के ला जाणार आहे. राज्य शासनाने तसा आदेश जारी के ला आहे. कामकाजानिमित्त कार्यालयांमध्ये किंवा आवारात येणाऱ्या अभ्यागतांनाही नाक आणि तोंड पूर्णपणे झाकले जाईल, अशा पद्धतीने मुखपट्टीचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. 

आवश्यक कागदपत्रे

’या सवलतीचा लाभ घेताना १८ वर्षे किंवा त्यावरील नागरिकांकडे वैध पारपत्र (Passport) आवश्यक आहे.

’अशा नागरिकांना लस दिल्यानंतर लस प्रमाणपत्रात पारपत्राचा क्रमांक अंतर्भूत केला जाईल.

’पहिली मात्रा घेताना पारपत्र पुरावा म्हणून घेतला नसला तरी संबंधित लसीकरण अधिकाऱ्यांनी त्याचा आग्रह न धरता वेगळे लस प्रमाणपत्र द्यावे. 

’शासकीय आणि खासगी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना लस घेताना वैध ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.

‘कोव्हॅक्सिन’च्या वापरास  ‘डब्ल्यूएचओ’चा पुन्हा नकार

बंगळुरु : कोव्हॅक्सिन लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तांत्रिक सल्लागार समितीने ३ नोव्हेंबपर्यंत राखून ठेवला आहे. ३ नोव्हेंबरच्या बैठकीपूर्वी ‘भारत बायोटेक’ने लशीची सुरक्षितता आणि परिणामकारकता दर्शवणारी अतिरिक्त माहिती सादर करणे आवश्यक आहे.