मुंबई: ‘तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस’शी संबंधित आठ व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने १८० कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी विलास बँकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तळवलकर्स प्रकरणात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला असून तो आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग (फसवणूक) कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी तळवलकर्स प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. तळवलकर्स बेटर व्हॅल्यू फिटनेस लि., तळवलकर्स हेल्थ क्लब लि. तसेच त्याच्या आठ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ ते २०१९ या कालावधीत १८० कोटी रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार लक्ष्मी विलास बँकेचे उपाध्यक्ष पनीरसेल्वम ए. यांनी केली आहे.  याबाबत तळवलकर्स ग्रुपशी संपर्क साधला असता याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी आम्हीच मागणी केली होती. तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी तळवलकर्स यांचा संबंध नव्हता, असे त्यांनी सांगितले.