मुंबई : अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई रेल्वे रुळावर बसवण्याचे काम अखेर पूर्ण झाले आहे. रविवारी मध्यरात्री हे जोखमीचे काम पूर्ण करण्यात आले. आता उंचावरची ही तुळई आठ मीटर खाली आणण्याचे काम केले जाणार आहे. पोहोच रस्ते बांधून पुलाची दुसरी बाजू सुरु होण्यास एप्रिल २०२५ ची मुदत देण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर आता दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी एक बाजू सुरू होऊ शकली. यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या तुळईचे भाग दिल्लीहून मुंबईत आणण्यास सुरुवात झाली होती. दुसऱ्या तुळईचे सुटे भाग येण्यास उशीर झाला. त्यामुळे पालिकेचे नियोजनही कोलमडले होते. त्यामुळे पुलाची दुसरी बाजू सुरू करण्याची मुदतही पुढे ढकलावी लागली होती. मात्र आता ही दुसरी तुळई रेल्वे रुळांवर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या आठवड्यात ही तुळई रेल्वेमार्ग परिसरात २५ मीटरपर्यंत सरकवण्याचे काम करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी ८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते सोमवार ९ सप्टेंबर पहाटे ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही तुळई रेल्वे भागावर सरकवण्यात आली. एकूण ९० मीटरपर्यंत सरकविण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. पश्चिम रेल्वे प्राधिकरणाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार व पश्चिम रेल्वेने निर्देश दिल्याप्रमाणे मेसर्स राईट्स लिमिटेड यांच्या तांत्रिक पर्यवेक्षण अंतर्गत हे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उंचावर असलेली ही तुळई येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने ८ मीटरपर्यंत खाली आणण्यात येणार आहे. त्यानंतर मार्गिकेची पुढील कामे पूर्ण केली जातील. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे ‘ब्लॉक’ मिळाल्यानंतर हे काम पूर्ण केले जाणार आहे.तुळई खाली आणल्यानंतर क्रॅश बॅरिअर, डांबरीकरण, पोहोच रस्त्यांची कामे, पथदिवे, मार्गिकांचे रंगकाम अशी विविध कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे भागातील पुलाचे काम दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत तसेच महानगरपालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्याचे काम दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे संपूर्ण पूल सुरु होण्यास पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे.
पहिल्या बाजूवरून लवकरच अवजड वाहने…
गोखले पुलाची एक बाजू सध्या सुरु असून त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात आला आहे. आता दुसरी तुळई स्थापन केल्यानंतर आधारासाठी उभारलेला लोखंडी हटवण्यात येईल व त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून अवजड वाहनांना देखील प्रवेश मिळू शकणार आहे.