शिवसेनेच्या ठाकरे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर लाँच केला आहे. यात उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा काही भाग वापरून “कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही,” या वक्तव्याला कोट केलं आहे. याशिवाय याआधीच्या ठाकरेंच्या सभेच्या गर्दीचे चित्रणही दाखवण्यात आलंय. एकूणच मागील टीझरच्या तुलनेत ठाकरे गटाच्या दसऱ्या मेळाव्याचा हा दुसरा टीझर अधिक आक्रमक दिसत आहे.
शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा टीझर शेअर करताना म्हटलं, “एक नेता, एक झेंडा, एक मैदान. एकनिष्ठ शिवसैनिकांचा. पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळावा!”




ठाकरे गटाच्या दुसऱ्या टीझरमध्ये काय?
या टीझरमध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत, “छत्रपतींची आपल्याला शिकवण आहे की, एकतर कुणाच्या पाठीवर वार करायचा नाही आणि जर कुणी पाठीत वार केला, तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही. आज माझ्या हातात काहीच नाही, अधिकार म्हणून काहीच नाही. तुमचे सगळ्याचे मिळालेले आशीर्वाद आणि शक्ती घेऊन मी पुढे लढायला चाललो आहे.”
“सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. हे (समोर बसलेले शिवसैनिक) ठाकरे कुटुंब आहे, संपवा. हे माझं ठाकरे कुटुंब आहे. यांच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवसेना प्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत. सगळे एकत्र येऊन शिवसेनेवर तुटून पडणार आहेत. मर्द असतो तो याच लढाईची वाट पाहत असतो आणि आम्हीही त्याच लढाईची वाट पाहत आहोत,” असंही या टीझरमध्ये म्हटलं आहे.
ठाकरे गटाचा दसरा मेळावा ५ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे होणार आहे.
हेही वाचा : शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं असताना मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, म्हणाले, “मी भाग्यवान आहे की…”
ठाकरे गटाच्या पहिल्या टीझरमध्ये काय?
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझरची सुरुवात शिवसेनेच्या भगव्या झेंड्यापासून होते. नंतर पुढे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटो दिसतो. यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि मग निष्ठेचा सागर उसळणार असं लिहिलेलं दिसतं.
विशेष म्हणजे या ३५ सेकंदाच्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे सभेसमोर भाषण देतानाचे फोटो आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित जनसमुदायाचे चित्रणही ठळकपणे दाखवण्यात आले. तसेच महाराष्ट्राची ताकद दिसणार असंही म्हटलं.
हेही वाचा : VIDEO:…अन् सुप्रिया सुळेंसमोरच मंत्री दीपक केसरकर संतापले, म्हणाले, “आधी पाहुण्यांचा आदर ठेवायला शिका, मी…”
उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.
शिंदे गटाच्या टीझरमध्ये काय?
शिंदे गटाने आपल्या दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तसेच शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ या प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.
टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आवाज वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा उल्लेख ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असा करण्यात आला आहे.
टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती दिसते. त्यानंतर बाळासाहेबांचा मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची मूर्ती सदृश्य प्रतिमा दिसते. व्हॉइस ओव्हरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात, “शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगाव झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सातत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे,” हे वाक्य ऐकू येतं. तसेच शेवटी, “जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” हे सुद्धा बाळासाहेबांच्या आवाजातच ऐकू येतं. “एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य,” अशी ओळ त्यानंतर झळकताना दिसते. मुख्यमंत्र्यांच्या फोटोजवळच ‘एकलव्य’ हा शब्द झकताना दिसतो. खरी शिवसेना कोणाची याचा निकाल निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीमध्ये लागणार आहे. त्यापूर्वीच शिंदे गटाने आपल्या मेळाव्याला ‘शिवसेनेचा मेळावा’ असं म्हटलं आहे.
हेही वाचा : “…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य
शिवसेनेची ओळख असणारा डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या बाजूला, “गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे, “शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार…” अशी ओळीही या टीझरमधील फोटोवर दिसतात. दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच ५ ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजता, बी. के. सी. मैदान, वांद्रा, मुंबई येथे हा मेळावा होणार आहे असंही व्हॉइस ओव्हरमधून सांगण्यात आलं आहे.