मुंबई : इमारतीच्या आवारात जाण्यास नकार दिल्याने एका व्यायाम शाळेतील प्रशिक्षकाने कर्तव्यावरील सुरक्षा रक्षकाला जबर मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना भांडुप परिसरात घडली आहे. याबाबत भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
शिवाजी बारवे (६०) असे या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून ते भांडुपच्या ड्रीम सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. याच सोसायटीमध्ये एक व्यायामशाळा असून आरोपी विशाल गावडे या व्यायामशाळेत काही वर्षांपासून प्रशिक्षक म्हणून काम करीत होता. बुधवारी रात्री आरोपी या सोसायटीमधील व्यायामशाळेत जाण्यासाठी आला होता.
यावेळी शिवाजी बारवे कर्तव्यावर होते. त्यांनी गावडेला व्यायामशाळेत जाण्यापासून रोखले. यामुळे संतप्त झालेल्या गावडेने गारवे यांना मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.