मुंबई: चेंबूरमधील सुभाष नगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून तीन कामगारांचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच परिसरातील वाहनतळाच्या पाचव्या मजल्यावरून पडून शुक्रवारी एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला.
चेंबूरमधील सुभाष नगर परिसरातील वैभवलक्ष्मी या इमारतीमध्ये शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. या ठिकाणी शुक्रवारीच कामावर रुजू झालेले सुरक्षा रक्षक नथुराम साखविलकर (५२) इमारतीमधील वाहनतळाची पाहणी करण्यासाठी पाचव्या मजल्यावर गेले होते.
तोल गेल्याने ते पाचव्या मजल्यावरून खाली पडले. त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी चेंबूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन नथुराम यांना तत्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
महिन्याभरापूर्वी याच परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा कामगार खाली पडले होते. यापैकी तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी कंत्रादार आणि देखरेख करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही मुख्य विकासकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
