मुंबई: सुरक्षा रक्षक मंडळांमध्येही आता अनुकंपा तत्त्वावरील भरतीला परवानगी देण्यात आली आहे. यानुसार सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये नोंद असलेल्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी किंवा मुले यापैकी एकाच वारसाला त्याजागी नोकरीची संधी दिली जाणार आहे. यासाठी कमाल वयाची अटही रद्द करण्यात आली असून संबंधित उमेदवार १०वी उत्तीर्ण असल्यास तो त्या जागी काम करण्यास पात्र ठरणार आहे.
शिफारस पात्र व अनुकंपा तत्त्वावरील सुरक्षा रक्षकांच्या नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत मंडळांनी मांडलेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून याविषयीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. यानुसार एखाद्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जागी पत्नीला किंवा पत्नी सुरक्षाा रक्षक असेल आणि तिचा मृत्यू झाल्यास तिच्या पतीला किंवा मुलांची सुरक्षा रक्षक म्हणून काम करण्यास इच्छुक असल्यास त्यांची त्याजागी नोंदणी केली जाणार आहे. यासाठी कमाल वयाची अट रद्द करण्यात आली असून किमान वय १८ वर्षे ठेवण्यात आले आहे. या उमेदवारांना चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र नोंदणीनंतर ४५ दिवसांच्या आत सादर करावे लागणार आहे.
खासगी सुरक्षा रक्षकांचीही होणार मंडळात नोंद
खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीत कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचीही आता सुरक्षा रक्षक मंडळात नोंद केली जाणार आहे. मात्र त्यांना त्याच सुरक्षा एजन्सीत काम करावे लागणार आहे. अशा नोंदणीसंदर्भात विनंती आल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळातील निरीक्षकांनी संंबंधित एजन्सीला भेट देऊन त्यांची सर्व कागदपत्रे तपासल्यानंतरच त्यांची नोंदणी केली जाणार आहे. यासाठी शारीरिक, मैदानी व शैक्षणिक पात्रतेचे निकष लावण्यात आले असून संबंधित सुरक्षा रक्षक हा किमान १० वी पास असणे आवश्यक राहणार आहे. सोबतच मुख्य मालकाचे शिफारस पत्र, संबंधित सुरक्षा रक्षकांचा भविष्य निर्वाह निधी भरल्याची नोंद. सुरक्षा रक्षकाने किमान ६० दिवस काम केल्याचे हजेरीपत्रक तसेच मंडळाच्या निरीक्षकाने संबंधित व्यक्ती स्वत: सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असल्याची खात्री केल्यानंतरच या खासगी सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंद केली जाणार आहे.
शारीरिक, मैदानी पात्रतेचे निकष
पुरुष उमेदवारांसाठी: उंची – किमान १६२ सेमी, वजन – ५० किलो, छाती – ७९ ते ८४ सेमी
महिला उमेदवारांसाठी: उंची: १५५ सेमी, वजन: ४५ किलो
मैदानी चाचणीत ५० पैकी २५ गुण आवश्यक
मैदानी परीक्षेसाठी: पुरुषांना ४०० मीटर धावणे, महिलांना २०० मीटर धावणे
