scorecardresearch

मेट्रो स्थानक फलाटावरील काचेच्या सुरक्षा भिंतीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न

दहिसर ते आरे मेट्रो मार्गिकेतील दहिसर पूर्व स्थानकावर ७ ऑगस्टला सायंकाळी काही तांत्रिक बिघाड झाला.

मेट्रो स्थानक फलाटावरील काचेच्या सुरक्षा भिंतीचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न
(संग्रहित छायाचित्र)

दहिसर पूर्व मेट्रो स्थानकातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई : दहिसर ते आरे मेट्रो मार्गिकेतील दहिसर पूर्व स्थानकावर ७ ऑगस्टला सायंकाळी काही तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने (एमएमएमओसीएल)ने तात्काळ दूर केला. मात्र त्यानंतर या स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आली. एक तरुण प्रवासी स्थानकावरील फलाटावर बसविण्यात आलेल्या काचेच्या सुरक्षा भिंतीचा(प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर सिस्टीम (पीएसडी)) स्वयंचलित दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला.

दहिसर पूर्व स्थानकावर ७ ऑगस्टला सायंकाळी ६.२४ मिनिटांनी काही तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाला. फलाटावरील १४ क्रमांकाच्या दरवाजामध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. हा बिघाड लक्षात आल्यावर तो तात्काळ दुरुस्त करून मेट्रो सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र या घटनेची अधिक माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता प्रवाशांच्या अतिउत्साहीपणामुळे, चुकीच्या वर्तनामुळे मेट्रो सेवेला फटका बसल्याचे समोर आले.

एक प्रवासी काचेच्या सुरक्षा भिंतिचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न करताना दिसला. ही स्वयंचलित यंत्रणा असल्याने कोणत्याही प्रकारची छेडछाड या यंत्रणांशी करण्याचा प्रयत्न  झाल्यास त्याची सूचना तात्काळ सुरक्षा यंत्रणांना मिळते. त्यानुसार सुरक्षा यंत्रणा दरवाजा क्रमांक १४ येथे पोहचले आणि त्यांनी तात्काळ बिघाड दुरुस्त केला. मात्र आता प्रवाशाच्या चुकीच्या वर्तनामुळे हे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. याची गंभीर दखल घेऊन एमएमएमओसीएलने प्रवाशांनी असे कोणतेही चुकीचे वर्तन करू नये असे आवाहन केले आहे. असे वर्तन करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशाराही दिला आहे. मेट्रो रेल्वे कायदा २००२ नुसार याप्रकरणी दोषी अढळल्यास ५ हजार रुपयांचा दंड, तुरुंगवास वा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या