मुंबई : मरिन लाइन्स भागातील सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहात एका विद्यार्थिनीची हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक आणि दुर्दैवी घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठीही एक समिती तयार करण्यात आली आली असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
या वसतिगृहातील सुरक्षा रक्षकाने एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईची घटना अतिशय वेदनादायी असून, याची दखल शासनाने गांभीर्याने घेतली आहे. राज्य सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली असून या घटनेच्या सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती स्थापन करण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ही घटना अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी असून सदर घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन सखोल चौकशीसाठी राष्ट्रीय उच्चस्तर अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक डॉ. विनायक निपुण यांची एक सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली असून समितीला तत्काळ अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच महिलांच्या वसतिगृहात यापुढे केवळ महिलाच सुरक्षा रक्षक तसेच अनुभवी अधीक्षक ठेवले जातील असेही पाटील यांनी सांगितले. सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी उच्चशिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालक तसेच अमरावतीच्या विभागीय सहसंचालक नलिनी टेंभेकर, एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे साहाय्यक प्राध्यापक सोनाली रोडे, विभागीय सहसंचालक केशव सुपे यांचा या समितीमध्ये समावेश असून समितीला आठवडाभरात अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.



