मुंबई : करोनामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर झालेल्या गोविंदांत आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसईसह राज्यात सर्वत्रच राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग घेऊन आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक प्रकारे मतांची पेरणीच केली. गोविंदा किंवा अन्य सणांमध्ये आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असायचे, यंदा मात्र भाजपने मुंबई, ठाण्यात दहीहंडीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

गेले दोन वर्षे सण-समारंभावर निर्बंध होते. यंदा निर्बंधमुक्त गोविंदा असल्याने सारेच राजकीय पक्ष उत्साहात सहभागी झाले होते. लवकरच मुंबई, ठाण्यासह १५ महानगरपालिका, २०० पेक्षा अधिक नगरपालिका, २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या दृष्टीने भाजप, शिवसेना, शिवसेनेतील शिंदे गट, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी साऱ्याच राजकीय पक्षांनी मतदारांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न दहीहंडीच्या माध्यमातून केला.

गणेशोत्सव, दहीहंडी या सणांवर आतापर्यंत शिवसेनेचे वर्चस्व असायचे. त्यानंतर मनसे व काही प्रमाणात राष्ट्रवादीचा सहभाग असायचा. यंदाच्या दहीहंडीचे वैशिष्टय़ म्हणजे शिवसेनेच्या बरोबरीनेच भाजपचा मुंबई, ठाण्यासह सर्वत्र सक्रिय सहभाग दिसला. मुंबईतील जांबोरी मैदान, ठाण्यातील दहीहंडीत भाजप नेत्यांच्या हंडय़ा लक्ष वेधून घेत होत्या. भाजपने सर्वत्र फोटो, पोस्टर, झेंडे या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छब्या सर्वत्र लक्ष वेधून घेत होत्या. ठाण्यातील टेंभी नाका या एके काळच्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात प्रथमच दहीहंडीमध्ये पंतप्रधान मोदी यांचा फोटो झळकला होता. राज्यात शिवसेना-भाजपची युती असताना आनंद दिघे यांच्या कार्यकाळात कधीही भाजप नेत्यांना या दहीहंडीत स्थान नसायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र भाजपला झुकते माप दिले होते. 

मुंबईत भाजपने गल्लोगल्ली दहीहंडय़ा उभारून किंवा झेंडे वा पोस्टर्स यांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती केली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकारानेच शहरभर व विशेषत: मराठी वस्त्यांमध्ये या उत्सवात भाजप उत्साहात सहभागी झाला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई व ठाण्यात विविध दहीहंडय़ांना भेटी दिल्या. या सणावर भाजपचे वर्चस्व अधोरेखित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वरळी या आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपने मोठय़ा प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले. वरळीत आमच्या मदतीवर निवडून आला होतात हे विसरू नका, असा टोला आशीष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. 

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटानेही आपले प्राबल्य असलेल्या भागांमध्ये शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटातील नेत्यांच्या हंडय़ांसह भाजपने आयोजित केलेल्या हंडय़ांना भेटी दिल्या. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून दादर परिसर ओळखला जातो. मुंबई महापालिकेच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज केला होता. हा पराभव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता. आता दादर भागातील आमदार सदा सरवणकर बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी सरवणकर यांनी दादरमधील मुंबई महानगरपालिकेच्या सात प्रभागांमध्ये दहीहंडी उत्सवांचे आयोजन केले होते, तर बंडखोरांकडून शिवसेना भवनासमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येऊ नये यासाठी युवा सेनेने काळजी घेतली होती. युवा सेनेने येथे उत्सवाचे आयोजन करण्यासाठी आधीच सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या. युवा सेनेने शिवसेना भवनासमोर निष्ठा दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते.

विविध पक्षांचा सहभाग

मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेतेही दहीहंडीत सहभागी झाले होते. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी विविध मंडळांना भेटी दिल्या. दक्षिण मुंबईतील दहीहंडय़ांना माजी खासदार मिलिंद देवरा यांनी भेटी दिल्या.

गोविंदा आरक्षणावरून वादाची चिन्हे; पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याबरोबरच गोविंदांना राज्य शासनाच्या सेवेत खेळाडूंसाठीच्या कोटय़ातून आरक्षण देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेवरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये पदके मिळवून जागतिकस्तरावर लौकिक प्राप्त करून देणाऱ्या खेळाडूंसाठी असलेल्या आरक्षणात गोविंदानाही वाटेकरी करणे म्हणजे खेळाडूंसांठीच्या आरक्षणाच्या मुख्य उद्देशालाच बाधा आणणारा हा निर्णय होऊ शकतो, असे टीकेचे सूर निघत आहेत.

राज्यात दहीहंडी सणाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत दहीहंडीला साहसी दर्जा देण्याची तसेच गोविंदांना शासकीय सेवेत खेळाडू म्हणून आरक्षण लागू करण्याची घोषणा केली. ही पूर्णपणे राजकीय व लोकानुनय करणारी घोषणा असल्याची राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागली आहे. गोविंदांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय चुकीचा व अर्थहीन आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.

राज्यात २००५ पासून अत्त्युच्च गुणवत्ताप्राप्त खेळाडूंसाठी राज्य शासकीय, निमशासकीय सेवेत ५ टक्के समांतर आरक्षण लागू करण्याचे धोरण अमलात आले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये पदके मिळविणारे खेळाडू राष्ट्रास तसेच राज्यास लौकिक प्राप्त करून देतात. खेळाडूंना खेळांमध्ये प्राप्त होणाऱ्या संधी व शैक्षणिक अर्हता मिळविण्याचा कालावधी एकच असल्याने त्यांना दोन्ही आघाडींवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येणे शक्य नसते. त्याचा परिणाम म्हणजे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. ही बाब विचारात घेऊन शासकीय, निमशासकीय, अनुदानप्राप्त शैक्षणिक व इतर संस्थांतील नोकऱ्यांमध्ये राज्यातील प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी ५ टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.