मुंबई : भारतीय वायुदलाचे फ्लाइंग ऑफिसर, निर्मलजीत सिंह सेखों यांच्या स्मरणार्थ आयोजित ‘सेखों इंडियन एअरफोर्स मॅरेथॉन २०२६’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने दोन विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेद्वारे रविवार, ४ ऑक्टोबरला होणाऱ्या मॅरेथाॅनसाठी कल्याण आणि पनवेल येथून मध्यरात्री या विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विशेष लोकल कल्याण येथून मध्यरात्री २.३० वाजता सुटून पहाटे ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. हार्बर मार्गावरील विशेष लोकल पनवेल येथून मध्यरात्री २.४० वाजता सुटून पहाटे ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या दोन्ही विशेष लोकल या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे मॅरेथॉनसाठी पहाटे मुंबईत येणाऱ्या स्पर्धकांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.