Prithvi Shaw Selfie Row: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि मॉडेल सपना गिल आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांच्यामध्ये सेल्फी काढण्यावरुन सुरु झालेला वाद अजूनही संपलेला नाही. सपना गिलला जामीन मिळाल्यानंतर तिने मुंबई विमानतळ पोलिस स्थानकात क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र आशिष यादव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सेल्फी वादानंतर पृथ्वी शॉचा मित्र आशिष यादव याच्या गाडीची काच फोडण्यात आली होती. त्याबद्दल ओशिवरा पोलिसांनी आठ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये एक सपना गिल देखील होती. पृथ्वी शॉने चौथ्यांदा सेल्फी देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद उफाळला होता. सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर लगेचच सपना गिलने हा गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे हे प्रकरण शमण्याचे नाव घेत नाही.

सपना गिलने १० कलमांतर्गत गुन्हा दाखल केला

सपना गिलने आता पृथ्वी शॉच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३४, १२० बी, १४६, १४८, १४९, ३२३, ३२४, ३५१, ३५४ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वकील काशिफ अली खान यांच्यामार्फत दाखल केलेल्या जामीनपत्रात सपना गिलने तिच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप “खोटे आणि बिनबुडाचे” असल्याचे तिचे म्हणणे आहे. सपना गिलला फसविण्यासाठी आणि तिच्या विरोधात कट कारस्थान करण्यासाठी हे आरोप केले गेले असल्याचेही जामीनपत्रात म्हटले आहे.

हे वाचा >> Photos: पृथ्वी शॉबरोबर सेल्फीसाठी वाद घालणारी ‘सपना गिल’ नक्की आहे तरी कोण? जाणून घ्या

सपना गिलच्या जामीनाला सरकारी वकीलांचा विरोध

पोलिसांच्यावतीने सरकारी वकील आतिया शेख यांनी सपना गिल आणि इतर आरोपींच्या जामीनाचा विरोध केला होता. या प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच आरोपींनी पृथ्वी शॉचा सूड घेण्यासाठी त्याचा पाठलाग केला, का तर पृथ्वीने फक्त सेल्फी देण्यासाठी नकार दिला म्हणून. सरकारी वकिलांनी सांगितले की याप्रकरणात पृथ्वी शॉचा जीव देखील या लोकांनी घेतला असता.

सत्र न्यायालयाने १० हजारांच्या जातमुचलक्यावर सपना गिलला जामीन दिला आहे. तिच्यावर १४३, १४८ (दंगा करणे), ३८४ (बळजबरी वसूली) आणि ५०६ (धमकी देणे) असे गुन्हे दाखल केलेले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पृथ्वी शॉ १६ फेब्रुवारी रोजी सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेला होता. तेव्हा सपना गिल आणि तिच्या मित्राने सेल्फीचा आग्रह धरला. शॉने दोघांसोबत सेल्फी काढला, त्यानंतर तोच गट परत आला आणि इतर आरोपींसोबत सेल्फी घेण्यास आग्रह धरू लागला. यावेळी शॉने आपण मित्रांसोबत जेवायला आलो असून त्रास द्यायचा नाही, असे सांगून नकार दिला. तक्रारीनुसार, आरोपीने आग्रह केल्यावर पृथ्वी शॉच्या मित्राने हॉटेल मॅनेजरला फोन करून त्यांच्याबद्दल तक्रार केली.

तक्रार मिळल्यानंतर हॉटेलचे मॅनेजर तेथे दाखल झाले त्यांनी सपना गिल आणि तिच्या मित्राला हॉटेल सोडण्यास सांगितले. या घटनेनंतर पृथ्वी शॉ आणि त्याचा मित्र रात्रीचे जेवण करून हॉटेलच्या बाहेर आले, तेव्हा ते लोक बेसबॉलच्या बॅट घेऊन हॉटेलबाहेर उभे होते. त्यांनी पृथ्वीच्या मित्राच्या बीएमडब्ल्यू कारची तोडफोड केली. आरोपींनी बेसबॉल बॅटचा वापर करून वाहनाच्या पुढील व मागील खिडक्या फोडल्या.