मुंबई : मुंबईतील अनेक लक्षवेधी लढतींपैकी एक असलेल्या प्रभादेवीतील प्रभाग क्रमांक १९४ कडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातील लढत अटीतटीची होणार असून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आणखी एक महालढत ठरणार आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे समाधान सरवणकर आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निशिकांत शिंदे यांच्यात ही लढत होणार आहे. ही लढत अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण असेल.

प्रभादेवीचा परिसर हा एकेकाळच्या एकसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर होणारी मुंबई महापालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यावर कोणाचे राज्य असेल याकडे प्रभादेवीकरांचेच नाही तर सगळ्या मुंबईचे आणि राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रभाग चांगलाच परिचित आहे. समाधान हे माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचे पूत्र आहेत. त्यामुळे ही निवडणूक सदा सरवणकर यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. समाधान सरवणकर हे मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. सरवणकर यांनी मोठे आव्हान विरोधकांपुढे उभे केले आहे.

त्यांच्याविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे निशिकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. निशिकांत शिंदे हे शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत. त्यामुळे त्यांच्या नावालाही वलय आहे. एकूणच ही निवडणूक उमेदवारांमधील लढतीपेक्षा सुनील शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यातील देखील आहे. तसेच ही लढत दोन शिवसेनेतील आहेत. विधानसभा निवडणुकीत माजी आमदार सदा सरवणकर यांचा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महेश सावंत यांनी पराभव केला होता.

या पराभवाची भरपाई करण्याचा प्रयत्न सरवणकर यांच्याकडून नक्की होणार. निशिकांत हे प्रभादेवीतील रहिवासी नसल्याचा प्रचार सरवणकर यांच्याकडून केला जात आहे. तर सरवणकर हे याच प्रभागात राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे. निशिकांत हे लोअर परळ परिसरातील रहिवासी असून त्या भागातील प्रभाग महिलांसाठी राखीव असल्यामुळे त्यांना प्रभादेवीतून उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेची या प्रभागातील कार्यकर्त्यांची फळी ही निशिकांत यांच्याकडील जमेची बाजू आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासून या प्रभागात शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन पक्षांमध्ये वारंवार हाणामारीचे प्रसंग उद््भवले आहेत. त्यामुळे ही लढाई या परिसरातील कार्यकर्त्यांसाठीही महत्त्वाची आहे. दोन तुल्यबळ उमेदवारांमधील ही लढत असून या लढतीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.