मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या दुर्दशेच्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कहाण्या सर्वश्रुत झाल्यांनंतर आता बेस्टच्या वाहकांनीही आपल्या भावनांना समाज माध्यमांवरून वाट मोकळी करून दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या वाहकांची बढती बंद झाल्यामुळे उतारवयाकडे झुकणाऱ्या बेस्टच्या वाहकांना चालत्या बसमध्ये उभे राहून तिकीट देण्याचे, लांब पल्ल्यांच्या मार्गावर काम करण्याचे, उन्हातान्हात उभे राहण्याचे काम दिले जात आहे. त्यामुळे बेस्टच्या वाहकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

बेस्ट उपक्रमाचे आर्थिक चाक दिवसेंदिवस खोल रुतत चालले आहेच पण कर्मचाऱ्यांचेही हाल होऊ लागले आहेत. त्यांच्या या दुर्दशेला कोणीही वाली नसल्यामुळे वाहकांनी समाजमाध्यमांवरून आपले त्रास व्यक्त केले आहेत. बेस्ट उपक्रमात ज्या वाहकांची २५ वर्षांची सेवा पूर्ण झाली असेल त्यांना कार्यालयीन स्वरुपाचे काम दिले जात असे. मात्र गेल्या सहा सात वर्षात ही पद्धत बंद पडली आहे. त्यामुळे बेस्टच्या ज्येष्ठ वाहकांनाही उतारवयात चालत्या बसमध्ये गर्दीतून वाट काढत काम करावे लागते आहे.

बसवाहकांचे काम हे पहाटे ४ ते रात्री बारा, एक वाजेपर्यंत चालते. त्यामुळे विविध पाळ्यांमध्ये काम करावे लागते. त्यामुळे वाहकांच्या झोपेच्या, जेवणाच्या वेळा बिघडतात. उतारवयात शारीरिक आजार बळावत असल्यामुळे ही कामे करणे शक्य नसते. त्यामुळे २५ वर्षांची सेवा झाली की वाहकांना कार्यालयीन स्वरुपाचे काम दिले जात असे. त्यात वाहकांच्या कामांचे वेळापत्रक लावणे, गाड्या किती किमी चालल्या त्याची नोंद ठेवणे, तिकीट निरिक्षकाचे काम करणे अशी कामे दिली जात होती.

मात्र गेल्या काही वर्षांत ही प्रथा बंद पडल्यामुळे वाहकांना उतारवयातही शारीरिक श्रमाचे काम करावे लागते आहे, असे बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आणि बेस्टचे कामगार नेते सुनील गणाचार्य यांनी सांगितले. बेस्टमध्ये सध्या कंत्राटदारांच्या गाड्यांची संख्या जास्त आहे. कंत्राटी गाड्यांबरोबर कंत्राटदाराचे वाहकही आहेत.

सध्या कंत्राटदारांच्या वाहकांना छोट्या मार्गावर पाठवले जाते. तर लांब पल्ल्याच्या मार्गावरील कामे बेस्टच्या वाहकांच्या गळ्यात पडतात, अशी माहिती एका वाहकाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. सध्या गाड्यांची संख्या अतिशय कमी असल्यामुळे गाड्या प्रवाशांनी खच्चून भरलेल्या असतात. त्यात वाट काढून तिकीट देणे, पैशांचा हिशोब ठेवणे ही कामे वाहकांना करावी लागत आहेत.

चालत्या बसमध्ये उभे राहून काम केल्यामुळे संधीवाताचे त्रास होतात. लांब पल्ल्याच्या मार्गामुळे जेवणाच्या वेळा चुकतात व विविध आजार बळावतात, अशा तक्रारीही वाहकांनी केल्या आहेत. दरम्यान, बेस्ट उपक्रमात आर्थिक तोटा कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांचा प्रवास दर्जेदार, जलद करण्याच्या नावाखाली भाडेतत्त्वावर गाड्या घेतल्या जात आहेत. त्याचा आर्थिक फटका उपक्रमाला बसतोच व त्याचे गंभीर दुष्परिणाम, मनस्ताप कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत असल्याचे वाहकांचे म्हणणे आहे.