Hema Malini Voting Video: भाजपाच्या मथुरा लोकसभेच्या खासदार आणि बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना आज मतदान केंद्रावर मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान करायला गेलेल्या असताना काही संतप्त मतदारांनी त्यांना घेरून मतदान केंद्रावरील अव्यवस्थेबद्दल जाब विचारला. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना काही जेष्ठ नागरिकांनी हेमा मालिनी यांना घेरले. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेमा मालिनी यांना संतापाचा सामना का करावा लागला?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी मतदान करून आल्यानंतर माध्यमांशी बोलतान दिसत आहेत. यावेळी एक वृद्ध मतदार त्यांच्याशी भांडण करताना दिसतो. “मी इथे ६० वर्षांपासून राहत आहे. इथे सकाळपासून गोंधळाची परिस्थिती आहे. मी सकाळी ७.४५ वाजता इथे आलो. पण आता ९.३० वाजता माझे मतदान झाले. कुणीही इथे काही माहिती देत नाही. कुणीही जबाबदार नाही. स्थानिक कार्यकर्तेही उत्तर देत नाहीत”, अशी तक्रार वृद्धाने केली.

वृद्ध मोठमोठ्याने ओरडत असताना हेमा मालिनी स्तब्ध झालेल्या दिसल्या. यानंतर बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी परिस्थिती हाताळण्यास सांगितले. संबंधित व्यक्तीने मग वृद्धाची समजूत घालत त्याला ‘आपण नंतर बोलू’, असे सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वृद्धाचे समाधान झाले नाही, त्याने ‘नंतर नाही आताच बोलू’, असे सांगून आपली नाराजी प्रकट केली.

यानंतर हेमा मालिनी माध्यमांशी बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, सर्व लोकांनी मतदान करायला हवे. जसे मी सकाळी येऊन मतदान केले. जर तुम्हाला सुरक्षितता, प्रगती, स्वच्छ हवा, चांगले रस्ते हवे असतील तर आपण सर्वांनी जबाबदारी घ्यावी. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने मतदान केले पाहिजे.