बेस्ट प्रशासनाची मंजुरी

रेल्वे, एसटीप्रमाणेच आता बेस्ट प्रशासनाने बस गाडय़ांमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना प्रवासात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या प्रस्तावानुसार ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना बसमधून प्रवास करताना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येईल. या प्रस्तावाला बेस्टकडून मंजुरी देण्यात आली.

बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना बेस्ट उपक्रमाकडून विविध सवलती आणि मुभा दिली जाते. यात बसमध्ये पुढच्या दरवाजाने प्रवेश करण्याची मुभा देतानाच आसन आरक्षितही ठेवले जाते. त्याचप्रमाणे पासातही सवलत देण्यात येते. महिन्याच्या पासांत ५० रुपये तर तीन महिन्याच्या पासांत १५० रुपये सवलत ज्येष्ठ नागरिकांना मिळते. मात्र दररोज प्रवास करताना तिकीट दरात सवलत मिळत नव्हती. त्यासाठी ही सवलत उपलब्ध करण्याचा निर्णय बेस्टकडून घेण्यात आला. त्यानुसार ६० वर्षे वयावरील नागरिकांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीपोटी खर्चाची प्रतिपूर्ती बेस्ट प्रशासनास महापालिकेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतुदही करण्यात आल्याचे बेस्टकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे याचा आर्थिक बोजा बेस्टवर पडणार नाही, अशी माहिती देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत हवी असल्यास त्यांच्याकडे आरएफ-आयडी स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे. हे कार्ड हरविल्यास किंवा खराब झाल्यास आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर ४० रुपये आकारून नवीन स्मार्ट कार्ड बेस्टकडून उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रवास करताना स्मार्ट कार्ड बसवाहकाला दाखविणे गरजेचे आहे. वाहक आपल्याजवळील ईटीआयएम मशीनवर नोंद करील आणि त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाला सवलतीचे

तिकीट देईल. या योजनेसाठी बेस्टवाहकांकडे असणाऱ्या मशीनमध्ये आवश्यक ते बदलही करण्यात येणार आहेत.

या योजनेपोटी येणाऱ्या आर्थिक भाराची प्रतिपूर्ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहे. प्रत्येक महिनाअखेर आर्थिक भाराचे देयक महापालिकेकडे सादर करण्यात येणार आहे.

सवलतीसाठी पात्रता

* ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्राचा रहिवासी असावा. यासाठी शासनाने दिलेले कोणतेही वैध प्रमाणपत्र सादर करावे.

* वयाची ६० वर्षे पूर्ण केल्याच्या पुराव्याकरिता जन्मनोंद प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, शालान्त परीक्षेचे प्रमाणपत्र इत्यादी कोणतेही पुरावे सादर करावे लागतील.

* ज्येष्ठ व्यक्तींना अन्य कोणतीही प्रवास सवलत नसावी. उदाहरणार्थ कॅन्सर रुग्ण, अंध, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार किंवा अन्य असे असल्यास एकाच वेळी एकच प्रवास सवलत राहणार आहे.