मुंबई : दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शालिनीताई पाटील याचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी माहीम येथील राहत्या घरी त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याच्या राजकारणातील एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

शालिनीताई पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणावर एक स्वतंत्र ठसा उमटवला होता. १९८० च्या दशकात त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात महसूल आणि सार्वजानिक बांधकाम सारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती.

सांगली लोकसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. सांगली विधानसभा मतदारसंघासह आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रदीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी क्रांतिसेना या संघटनेच्या माध्यमातून महिलांचे संघटन केले होते. कोरेगाव आणि सातारा परिसरात शिक्षण आणि सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

शालिनीताई पाटील यांच्यावर सरकारी इतमामात होणार अंत्यसंस्कार

डॉ. शालिनीताई पाटील यांचे पार्थिव उद्या (रविवार) सकाळी सातारा रोड येथे आणण्यात येणार असून, सकाळी आठ ते ११ या वेळेत चंद्रकांत वसंतरावदादा पाटील विद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर साडेअकरा वाजता येथील वसना नदीकाठी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

शालिनीताई पाटील यांच्यावर सत्यशोधक विचाराचे संस्कार

डॉ. शालिनीताई पाटील यांचा जन्म त्यांच्या आजोळी कुमठे (ता. कोरेगाव) येथे झाला. वडील सत्यशोधक ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील यांची विचारधारा व त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शालिनीताई पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण त्यांच्या गावी सातारारोड, पाडळी येथील त्या वेळच्या कूपर हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूर येथे झाले. त्यावेळी त्यांनी कला शाखेत शिवाजी विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. पुढे त्यांनी कोल्हापूर येथेच कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून पीएचडी केली.

सांगली आणि सातारा जिल्ह्याचे केले नेतृत्व

डॉ. शालिनीताई पाटील प्रथम सांगली येथून १९८० मध्ये आमदार झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्या महसूल मंत्री होत्या. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात त्या बांधकाम मंत्री होत्या. दरम्यान, वसंतदादा पाटील यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर डॉ. शालिनीताई पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्या सांगली येथून खासदार झाल्या. नंतर त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात सातारा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अपयश आले; परंतु त्यावेळी त्यांनी साखर कारखाना उभारणीचा शब्द दिला होता. त्यानुसार चिमणगाव (ता. कोरेगाव) येथे श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्याच दरम्यान म्हणजे १९९९ मध्ये त्यांनी कोरेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या. पुढे दुसऱ्या टर्मला देखील त्या पुन्हा कोरेगावच्या आमदार झाल्या आणि सलग दहा वर्षे त्यांनी विधानसभेत कोरेगावचे प्रतिनिधित्व केले.

आरोग्य क्षेत्रात शालिनीताई यांनी उठवला आपला ठसा

सांगली येथील कार्यकाळात त्यांनी श्री लक्ष्मी महिला सहकारी बँक ही महिलांची पहिली बॅंक स्थापन केली. याशिवाय त्यांनी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान स्थापन केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवी मुंबई व सिंधुदुर्ग येथे रुग्णालयांची उभारणी केली. डॉ. शालिनीताई पाटील यांनी सत्यशोधक ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील यांच्या विचारांचा वारसा जपला. वडिलांच्या नावाने सातारारोड, पाडळी येथे ज्योत्याजीराव बयाजीराव फाळके पाटील ट्रस्टची स्थापना केली. सध्या या ट्रस्टमार्फत सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून परिसरातील साडेनऊशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.