ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे म्हणजेच विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी सायंकाळी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या डॉ. देशपांडे यांनी आज सकाळी जगाचा निरोप घेतला. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई आणि नातू असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंत्यदर्शनासाठी डॉ. वि भा देशपांडे यांचे पार्थिव पटवर्धन बागेतील त्यांच्या राहत्या घरी दुपारी १२ वाजल्यापासून ठेवण्यात येईल. गुरुवारी दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

डॉ. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात योगदान देत राहिले. डॉ. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळपास १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाड्मयात मोलाची भर टाकली होती. त्यांची जवळपास ५० पेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ‘, ‘|| नाट्यभ्रमणगाथा ||’ , ‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणाऱ्या वि भा देशपांडे यांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेले अनुभव म्हणजेच त्यांचे पुस्तक ‘नाट्यभ्रमणगाथा’. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्स्ना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी त्यांना भेटली. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यांनी यातून उलगडले आहेत.

उत्कृष्ट संपादनासाठी त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याचसोबत त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पुस्तके
आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा (प्रेस्टिज प्रकाशन , पुणे)
कालचक्र : एक अभ्यास (स्नेहवर्धन प्रकाशन , पुणे)
नटसम्राट : एक आकलन (पुणे विद्यापीठ प्रकाशन)
नाटककार खानोलकर (नूतन प्रकाशन , पुणे)
नाट्यभ्रमणगाथा (५१वे पुस्तक), (माधवी प्रकाशन, पुणे. जुलै-२०१५)
नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती) . (विमल प्रकाशन , पुणे)
नाट्यव्यक्तिरेखाटन , पौराणिक-ऐतिहासिक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
नाट्यसंवाद रचना कौशल्य (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ)
नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख) (सिग्नेट पब्लिकेशन, पुणे)
निवडक नाट्य मनोगते (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
मराठी नाटक पहिले शतक (व्हीनस प्रकाशन , पुणे)
मराठी रंगभूमी – स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ – रंगभूमीचा इतिहास (दोन खंड) (व्हीनस प्रकाशन , पुणे)
माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास (उन्मेष प्रकाशन , पुणे)
यक्षगान लोकनाटक (नवीन उद्योग प्रकाशन , पुणे)
रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन (इंद्रायणी प्रकाशन , पुणे)
सुमारे एकूण २५ नाट्यविषयक लेखनाची पुस्तके
(इ.स. १९६३ पासूनच्या) स्फुट आणि ग्रंथस्वरूपाचे लेखन
स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक (व्हीनस प्रकाशन , पुणे)

संपादनात्मक लेखन  
के. नारायण काळे यांच्या लेखांचे संपादन (प्रतिमा रूप आणि रंग) (नूतन प्रकाशन , पुणे)
गानयोगी मल्लिकार्जुन मन्सूर (पृथ्वी प्रकाशन , पुणे)
निवडक एकांकिका – १९७८ (मेहता प्रकाशन , पुणे)
प्रयोगक्षम एकांकिका – १९८३ (मेहता प्रकाशन , पुणे)
निवडक नाट्यप्रवेश भाग १ (पौराणिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
निवडक नाट्यप्रवेश भाग २ (ऐतिहासिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
निवडक नाट्यप्रवेश भाग ३ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
निवडक नाट्यप्रवेश भाग ४ (सामाजिक नाटके) . (आनंद पुस्तक मंदिर , पुणे)
पु. ल. पंच्याहत्तरी (सहसंपादन) (पु. ल. गौरव समिती)
प्रतिमा रूप आणि रंग (के. नारायण काळे यांचे लेख) (नूतन प्रकाशन , पुणे)
मराठी एकांकी (हिंदी) (भारतीय भाषा परिषद , कलकत्ता)
मराठी कलाभिरुची (कॉन्टिनेन्टल प्रकाशन , पुणे)
मराठी नाट्यकोश (निशांत प्रकाशन, कलागौरव , पुणे)
मराठी नाट्यसमीक्षा : काही दृष्टिकोण (मेहता प्रकाशन , पुणे)
मराठी भाषा – साहित्य (मेहता प्रकाशन , पुणे)
रंगयात्रा(१९५० ते १९८५ मधील रंगभूमीविषयक लेखांचा संग्रह) (नाट्यसंपदा प्रकाशन

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior marathi drama critic vishwanath bhalchandra deshpande aka vi bha deshpande passes away
First published on: 09-03-2017 at 11:36 IST