मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुमंतराव गायकवाड यांचे (वय ८४) गुरुवारी पहाटे निधन झाले. रिपब्लिकन पक्षासाठी आयुष्य समर्पित करणारे सुमंतराव गायकवाड यांच्या निधनामुळे एकूणच आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
रिपब्लिकन पक्षाचे सुमंतराव गायकवाड हे एके काळी लढाऊ नेते म्हणून ओळखले जायचे. १९६९ मध्ये माटुंगा लेबर कॅम्पमधून ते मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. ते बेस्ट समितीचे सदस्य राहिले. त्यानंतर रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २००६ मध्ये त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी काही काळ पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. सध्या त्यांचे नवी मुंबई, वाशी येथे वास्तव्य होते.
वयोमानानुसार त्यांच्या प्रकृतीच्या तक्रारी होत्या. गुरुवारी त्यांचे पहाटे निधन झाले. तुर्भे येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी रामदास आठवले, अविनाश महातेकर, चंद्रकांत हंडोरे, अर्जुन डांगळे, नानासाहेब इंदिसे, गौतम सोनवणे, सुरेश बारिशग, सिद्धार्थ कासारे, सिद्राम ओहोळ, आदी नेते उपस्थित होते.