मुंबई : ‘माती सांगे कुंभाराला’, ‘रात्र काळी घागर काळी’ यासारख्या अवीट चालीच्या गाण्यांनी घरोघरी लोकप्रिय झालेले ज्येष्ठ गायक, संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे शनिवारी मध्यरात्री १२ वाजता निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. वयाच्या पंधराव्या वर्षी आकाशवाणीवर सगळ्यात लहान वयाचा गायक म्हणून संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या गोविंदराव पोवळे यांनी जवळपास चार दशकांहून अधिक काळ सुगम संगीत क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. त्यांच्या निधनाने भावगीत सुवर्णयुगाचे अखेरचे पर्व हरपले आहे.
पनवेलजवळील चिरनेर गावात गोविंदराव पोवळे यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार होते आणि आई पार्वतीबाई यांनाही गाण्याची आवड असल्याने गाण्याचा वारसा त्यांना आपसूकच मिळाला होता. शाळेत असताना एकदा कविता वाचनाच्या निमित्ताने त्यांना गायनकला उपजत आहे, याचा साक्षात्कार त्यांचे शिक्षक आणि आईवडिलांना झाला.
वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी आकाशवाणी केंद्रावर गायनासाठी ऑडिशन दिली होती. पहिल्याच ऑडिशनमध्ये त्यांची निवड झाली आणि आकाशवाणीसाठी सुगम संगीत गाणारे सर्वात लहान वयाचे गायक होण्याचा मान त्यांना मिळाला. ३० मार्च १९४८ रोजी त्यांनी पहिल्यांदा आकाशवाणीसाठी गायलेल्या गाण्याचे थेट प्रसारण झाले. इथून पुढे त्यांचे आकाशवाणीशी सूर जुळले ते कायमचेच. पुढे अनेक वर्षे त्यांनी आकाशवाणीसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले.
आकाशवाणीवर सुरुवातीला गजानन वाटवे, सुधीर फडके, आर. एन. पराडकर, दशरथ पुजारी, विठ्ठल शिंदे, दत्ता वाळवेकर आणि गोविंद पोवळे हे सातच कलाकार गायन-वादन सादर करत असत. आकाशवाणीवरचे त्यांचे गायनाचे कार्यक्रम एचएमव्हीच्या कामेरकरांनी ऐकले आणि वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी एचएमव्हीसाठी पहिले गीत ध्वनिमुद्रित केले.
‘उमटली रामाची पाऊले’ हे त्यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केलेले पहिले गाणे. जानकी अय्यर यांनी हे गाणे गायले होते. त्यानंतर त्यांनी संगीतबध्द केलेली माणिक वर्मा यांच्या आवाजातली ‘पैंजण हरीचे वाजती’ आणि ‘शुभंकरोती कल्याणम’ ही दोन गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर पोवळे यांनी संगीतबध्द केलेली सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील ‘कामधाम संसार विसरुनी हरी भजनी रंगली राधिका’ हे गाणेही लोकप्रिय झाले.
‘माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’ हे मधुकर जोशी यांनी लिहिलेले आणि पोवळे यांनी गायलेले, संगीतबध्द केलेले गाणे तसेच, त्यांनी गायलेली ‘रात्र काळी घागर काळी’ , ‘गंगा आली रे अंगणी’ आदी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
१९५७ साली पोवळेंनी गिरगावमध्ये सुगम गायनाचे क्लासेस सुरू केले. शास्त्रीय संगीताप्रमाणेच सुगम संगीताची परीक्षा सुरू करण्याचे श्रेयही पोवळे यांना जाते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शंभरहून अधिक गाणी संगीतबध्द केली. मराठी सुगम संगीताच्या सुवर्णयुगातील अखेरचा शिलेदार म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या निधनाने सुगम संगीताच्या इतिहासातील हे सुवर्णपान गळून पडले आहे.
