‘करोनाकाळ संपला अन् गगन उजळले’

‘हृदयनाथ’ हा पुरस्कार मिळणे म्हणजे साक्षात परमेश्वराने आपणहून हाती खजिना देण्यासारखे आहे,

ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते ‘हृदयनाथ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मुंबई : ‘‘व्यासपीठ म्हणजे आम्हा कलाकारांसाठी ‘गगन’ आहे. प्रेक्षकांच्या साथीने हे गगन करोना साथीच्या मोठय़ा अवधीनंतर आजपासून उजळू लागले आहे,’’ अशी भावना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. यंदा हृदयनाथ मंगेशकर यांनी ८५ व्या वर्षांत पदार्पण केले असून त्यानिमित्ताने हृदयेश आर्ट्सतर्फे विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात मंगळवारी स्वरसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांना पंडितजींच्या हस्ते ‘हृदयनाथ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

‘हृदयनाथ’ हा पुरस्कार मिळणे म्हणजे साक्षात परमेश्वराने आपणहून हाती खजिना देण्यासारखे आहे, अशा शब्दांत सुरेश वाडकर यांनी भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे पुत्र बैजनाथ मंगेशकर यांनी गायलेले आणि पंडितजींनी संगीतबद्ध केलेले ‘चांदण्याचा झोत’ गाण्याचे प्रकाशन करण्यात आले. टाळेबंदीनंतर नाटय़गृह सुरू झाल्याने ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ या सूरमयी संध्येला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभला. 

कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने शांताबाईंच्या गीतांनी या कार्यक्रमाला स्वरसाज चढवला. विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार, जितेंद्र अभ्यंकर आणि प्राची देवल यांनी ही संध्याकाळ आपल्या मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध करत प्रेक्षकांची मने जिंकली. या सोहळय़ाला ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, बैजनाथ मंगेशकर उपस्थित होते. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे अतिरिक्त संचालक नीरज अग्रवाल, विलेपार्लेचे आमदार अ‍ॅड. पराग अळवणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, गायिका पद्मा वाडकर, गायिका अर्चना गोरे यांनीही उपस्थिती लावली.

आठवणींना उजाळा..

‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ गाण्यामधील ‘कोणी तरी आरशात आहे’ या वाक्याचा अर्थ नायिकेशी जुळत नाही असं जब्बार पटेल यांना वाटले. मात्र गीतकार सुरेश भटांना ते पटले नाही. शांतबाईंनी क्षणातच ‘तुझे हसू आरशात आहे’ ही ओळ सुचवली, तेव्हा सुरेश भटही खूश झाले. पौर्णिमेचा चंद्र, त्या प्रकाशात चकाकणारी वाळू, समुद्रकिनारा आणि आनंदाने नाचणारे कोळी असा निसर्ग मी पाहिला. त्यावर एक चाल सुचली. शांताबाईंना त्या प्रसंगावर गाणं लिहिण्याची विनंती केली आणि त्या प्रसंगावर ‘आज पुनवा सुटलंय दमानं, दरियाच्या पान्याला आयलंय उदान. पिऊन तुफानवारा’ या सुंदर ओळी शांताबाईंनी लिहिल्या, अशी आठवण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी या वेळी सांगितली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Senior singer padma shri suresh wadkar honored with hridaynath award zws

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या