मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने सोशल मीडियावर जोरदार जाहिरातबाजी केली असली तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ढिसाळ नियोजनाचा फटका मतदारांना बसला. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था करण्यात आली नव्हती तर मतदार यादीत नाव शोधताना खूपच त्रास होत असल्याचे आढळून आले.
मतदान केंद्रांवर ‘कोणते उमेदवार उभे आहेत’ याची माहिती देणारे फलकच लावण्यात आलेले नव्हते. २०१७ च्या निवडणुकीत प्रत्येक केंद्राबाहेर उमेदवारांचे नाव, पक्ष आणि चिन्ह अशी सविस्तर माहिती देणारे फलक असायचे. यंदा मात्र अशी कोणतीही व्यवस्था नव्हती.
मतदान केल्यावर बाजूला व्हीव्हीपॅट किंवा लाईटद्वारे आपण कोणाला मत दिले हे स्पष्ट दिसत असे. मात्र, यावेळी मत कोणाला दिले हे मशीनवर स्पष्ट दिसून येत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यातच, बोटाला लावली जाणारी शाई हात धुतल्यावर लगेच निघून जात असल्याने शाईच्या दर्जावरही शंका व्यक्त केली जात आहे.
बुथ शोधताना कसरत
महापालिकेकडून मतदारांना दिलेल्या चिठ्ठीतील माहितीनुसार प्रत्यक्ष केंद्रावर गेल्यावर बुथ किंवा खोली शोधताना नागरिकांची दमछाक होत होती. पूर्वी प्रत्येक खोलीच्या बाहेर त्या खोलीतील मतदार यादीचा क्रमांक नमूद केलेला असायचा, ज्यामुळे केंद्र शोधणे सोपे जायचे. यावेळी तशी व्यवस्था नव्हती. स्वयंसेवकांची प्रचंड कमतरता असल्याने या गोंधळात अधिक भर पडली.
निवडणूक आयोगाकडून नेहमीच दिव्यांग आणि वृद्धांसाठी सोयी-सुविधा असल्याचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे वृद्ध आणि दिव्यांगांना त्रास सहन करावा लागला. य उन्हाचा तडाखा असतानाही रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. मतदार याद्या वेळेवर अद्यावत न केल्याने, अनेक नागरिक ज्या विभागात राहतात, त्या प्रभागातील उमेदवाराला मत न देता, त्यांना दुसऱ्याच विभागातील उमेदवाराला मत द्यावे लागत होते.
