शेअर बाजारात आज (गुरुवारी) दिवसभर मंदीचेच वातावरण राहिले. कारण, सकाळी शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स १००० अंकांनी गडगडला होता. आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमधील घसरणीचे पडसाद शेअर बाजारात उमटले होते. हीच स्थिती बाजार बंद होतानाही कायम होती. शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स ७६० अंकांनी तर निफ्टी २२५ अंकांनी कोसळला. तसेच फायनान्शिअल शेअर्समध्येही मोठी घसरण पहायला मिळाली.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोर स्थिती आणि फायनान्शिअल शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. बाजाराच्या शेवटी सेन्सेक्स ७६० अंकांनी घसरत ३४००१वर बंद झाला. तर निफ्टी २२५ अकांनी घसरत १०२३५ वर बंद झाला. फायनान्शिअल सेवा आणि बॅकिंग सेक्टरमध्ये तेजीने घसरण झाली. एसबीआयच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांनी घसरण पहायला मिळाली. इंडिया बुल्स आणि बाजाज फिनसर्व या कंपन्यांचे शेअर्समध्ये आज सर्वाधिक घसरण झाली. मात्र, एनर्जी सेक्टरमध्ये चांगली खरेदी झालेली पहायला मिळली. एचपीसीएलमध्ये १६ टक्के तेजी पहायला मिळाली.

गेले काही दिवस शेअर मार्केटमध्ये पडझड सुरु असतानाच बुधवारी शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्सने ४६१ अंकांची मुसंडी घेतली होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३ लाख कोटींची भर पडली होती. मात्र, गुरुवारी शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण झाली आणि गुंतवणूकदारांना पुन्हा पडझडीच्या त्सुनामीचा तडाखा बसला.