मुंबई : भारत-युरोपीय महासंघादरम्यान मुक्त व्यापार कराराची झालेली घोषणेने निर्माण केलेल्या उत्साहामुळे, बँक, धातू कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीच्या सपाट्यामुळे मंगळवारच्या सत्रात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स त्रिशतकी मुसंडीसह सकारात्मक बंद नोंदवला. सत्राअखेरीस सेन्सेक्स ३१९.७८ अंशांनी वधारून ८१,८५७.४८ पातळीवर स्थिरावला. सत्रादरम्यान, त्याने ८२,०८४.९२ अंशांची उच्चांकी आणि ८१,०८८.५९ या नीचांकी पातळीला स्पर्श करत, तब्बल हजार अंशांच्या परिघात अस्थिरता दर्शवली. तेजीवाल्यांनी जोर लावूनही सेन्सेक्सला ८२ हजार अंशांपुढे बंद नोंदवण्यास अपयश आले. दुसरीकडे निफ्टी १२६.७५ अंशांनी वधारला आणि २५,१७५.४० पातळीवर बंद झाला.

भारत आणि युरोपीय महासंघाने मंगळवारी महत्त्वाकांक्षी मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला सर्व करारांची जननी असे संबोधले. हा करार जागतिक स्तरावरील अस्थिर वातावरण आणि प्रामुख्याने अमेरिकेच्या वाढत्या आयात शुल्क धोरणामुळे झालेल्या व्यापार अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जात आहे.इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार, असे पंतप्रधान मोदी यांनी २७-देशांच्या युरोपीय गटाच्या शीर्ष नेत्या, उर्सुला व्हॉन डर लेयेन आणि अँटोनियो कोस्टा यांच्याशी झालेल्या शिखर बैठकीनंतर सांगितले.

अमेरिकेच्या वाढत्या शुल्कामुळे निर्माण झालेली व्यापक जोखीम ही भारत-युरोपीय महासंघासरम्यान झालेल्या द्विपक्षीय व्यापार कराराच्या अंतिम स्वरूपामुळे कमी होण्याची आशा आहे. यामुळे भांडवली बाजारात गुंतवणूकदारांना मोठा आधार दिला. मात्र परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडून सातत्याने सुरू असलेल्या समभाग विक्रीमुळे आणि तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या असमाधानकारक कामगिरीमुळे देशांतर्गत बाजारातील वाढ मर्यादित राहिली, असे ऑनलाइन ट्रेडिंग मंच असलेल्या एनरिच मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनमुडी आर यांनी सांगितले.

सेन्सेक्समधील कंपन्यांपैकी, अदानी पोर्ट्स, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, टेक महिंद्र, एनटीपीसी, स्टेट बँक, अल्ट्राटेक सिमेंट आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांचे समभाग सर्वाधिक वधारले. ॲक्सिस बँकेचा समभाग ४ टक्क्यांहून अधिक वधारला, कारण कंपनीने डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४ टक्के वाढ नोंदवली असून, तो मागील वर्षीच्या याच काळातील ६,७४२.९९ कोटी रुपयांवरून ७,०१०.६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याउलट, महिंद्र अँड महिंद्र, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, इटर्नल आणि आयटीसी यांनी गुंतवणूकदारांची निराशा केली.