मुंबई : सकारात्मक जागतिक कल आणि आघाडीच्या समभागांमध्ये खालच्या भावात झालेल्या खरेदीमुळे शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ७६७ अंशांची वाढ झाली. तेजीवाल्यांनी दाखविलेल्या या सक्रियतेने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने दोन आठवड्यापूर्वीच्या उच्चांकांना पुन्हा गाठता आले.

निर्देशांकात मोठे योगदान असणाऱ्या इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी लावलेला खरेदीचा सपाटा हे शुक्रवारच्या व्यवहारांचे वैशिष्ट्य ठरले. वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करत कंपन्यांची तिमाहीतील सरस कामगिरी, आर्थिक सुधारणांवर सरकारचा भर आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित उत्साहदायी आकडेवारीवर गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्याने निर्देशांकांनी आठवडाभरात गमावलेली गती पुन्हा प्राप्त केली, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

शुक्रवारी बाजारातील व्यवहार थंडावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ७६७ अंशांनी कमाई करत ६०,६८६.६९ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये समाविष्ट आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी २५ कंपन्यांचे समभाग तेजी दर्शवीत होते. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये २२९.१५ अंशांची वाढ झाली. तो प्रथमच २७ ऑक्टोबरनंतरची उच्चांकी पातळी गाठत १८,१०२.७५ पातळीवर स्थिरावला. गृह निर्माण, माहिती तंत्रज्ञान आणि ऊ र्जा निर्देशांकातील वाढीमुळे निफ्टीच्या तीन दिवसांच्या घसरणीला विराम मिळाला.