सेन्सेक्स १,७४७ अंशांनी घसरला; रशिया-युक्रेन तणाव, तेल भडक्याचा परिणाम

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी

मुंबई : गेल्या काही महिन्यांत सप्ताहारंभीचा वार भांडवली बाजारासाठी कसा घातवार ठरत आला आहे, त्याची प्रचिती शेअर निर्देशांकाच्या १,७४७ अंशांच्या भीतीदायक घसरणीने सोमवारी पुन्हा एकदा दिली. युक्रेन-रशियातील वाढता युद्धजन्य तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात पिंपामागे ९५ डॉलरवर गेलेले खनिज तेलाचे दर ही पडझडीची कारणे ठरली़

डॉलरच्या तुलनेत रुपयाचे तीव्रतेने सुरू असलेले अवमूल्यन आणि त्याच वेगाने माघारी जाणारी विदेशी गुंतवणूक यामुळे देशांतर्गत गुंतवणूकदारांवरील चिंतेची छाया अधिकच गडद झाली आहे. परिणामी आशिया आणि युरोपातील प्रमुख भांडवली बाजारांचे अनुकरण करीत, त्याहीपेक्षा मोठी घसरण स्थानिक बाजारांत, सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी सोमवारी नोंदविली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्स १,७४७.०८ अर्थात जवळपास ३ टक्के गडगडून, ५६,४०५.८४ वर बंद झाला. गेल्या वर्षभरातील (२६ फेब्रुवारी २०२१ नंतरची) एकाच सत्रात झालेली ही सेन्सेक्समधील सर्वात मोठी घसरण आहे.

‘निफ्टी’ वर्षभरात प्रथमच १७ हजारांखाली

राष्ट्रीय शेअर बाजाराचा- निफ्टी निर्देशांक ५३१.९५ अंश (३.०६ टक्के) गडगडून दिवसअखेर १६,८४२.८० वर स्थिरावला. हा निर्देशांक वर्षभरात पहिल्यांदाच १७ हजारांखाली घसरला आहे.

‘सेन्सेक्स’मधील ३० पैकी केवळ ‘टीसीएस’चा अपवाद केल्यास, अन्य सर्व आघाडीचे समभाग मोठय़ा फरकाने आपटले. टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक

५.४९ टक्क्यांची घसरण दिसून आली. गुरुवारी रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘जैसे थे’ पतधोरणाने मोठी मूल्यवाढ झालेल्या स्टेट बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी, इंडसइंड, कोटक बँक आणि मारुतीच्या समभागांत गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. सर्वच १९ क्षेत्रीय निर्देशांकांना नुकसान सोसावे लागले. स्थावर मालमत्ता, धातू आणि बँकिंग निर्देशांक पाच टक्क्यांहून अधिक घसरले. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात प्रमुख निर्देशांकापेक्षा मोठी ४.१५ टक्क्यांची घसरण झाली.

गुंतवणूकदारांना साडेआठ लाख कोटींचा फटका

सलग दोन सत्रांत ‘सेन्सेक्स’ने एकूण २,५२०.१९ अंशांनी गटांगळी खाल्ली आहे. शुक्रवारच्या सप्ताहाअखेरच्या व्यवहारात अमेरिकेतील चार दशकांतील उच्चांकावर पोहोचलेल्या महागाईच्या धडकीने ‘सेन्सेक्स’मध्ये ७७८ अंशांची घसरण झाली होती. सोमवारच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांच्या मत्तेतील ८.४७ लाख कोटी रुपयांचा ऱ्हास झाला आहे. ताज्या घसरणीचा सर्वात मोठा दणका बाजारात नव्याने सूचिबद्ध झालेल्या नवउद्यमी कंपन्या म्हणजे वन९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम), झोमॅटो, नायका आणि पीबी इन्फोटेक या समभागांना बसला.

पुढे काय?

किरकोळ महागाई दराची आकडेवारी ही बाजारातील व्यवहार आटोपल्यानंतर सायंकाळी जाहीर झाली. त्याचे मंगळवारच्या व्यवहारात बाजारात नकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आपल्या बाजाराचा कल अपेक्षेप्रमाणे ठरवत आहेत. रशिया- युक्रेनमधील तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तापलेल्या खनिज तेलाच्या किमतीतील ९५ डॉलपर्यंतची वाढ या प्रतिकूल घडामोडींनी मंदीवाल्यांना बाजारावरील पकड मजबूत करण्यास वाव मिळवून दिला आहे. सोमवारची मोठी पडझड पाहता, निर्देशांक आणखी खाली गडगडण्याची शक्यता आहे, असे मत रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष-संशोधन विभागाचे उपाध्यक्ष, अजित मिश्रा यांनी व्यक्त केले.

धास्ती..

युक्रेनच्या मुद्दय़ावरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्या आहेत. घबराटीच्या वातावरणात गुंतवणूकदार जोखमीबाबत दक्ष बनल्याचे दिसून येत आहे. ‘फेडरल रिझव्‍‌र्ह’ या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अधिकच धास्तावले आहेत.

चिंतेस कारण..

देशांतर्गत घाऊक महागाई निर्देशांक डिसेंबरमधील १३.५६ टक्क्यांवरून जानेवारीमध्ये १२.९६ टक्क्यांपर्यंत किरकोळ ओसरला असला तरी, इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. या नकारात्मक बाबींनी गुंतवणूकदारांच्या चिंता वाढविल्या आहेत, असे जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.