संवेदनशील माहिती फडणवीसांनी नाही, तर नवाब मलिक आणि आव्हाडांनी उघड केली; रश्मी शुक्लांचा दावा

राज्यानेच अवमान केला असून आपल्याकडे कुठलीच कागदपत्रे नाहीत, असे रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात म्हटले आहे.

Sensitive information revealed by Nawab Malik and Jitendra Awhad Rashmi Shukla claims

फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने गुन्हा दाखल केला असून तो रद्द करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याआधी रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंग आणि त्यामध्ये आलेल्या काही अधिकाऱ्यांच्या नावांसंदर्भात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला होता. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंग आणि गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फोन टॅपिंगप्रकरणी रश्मी शुक्ला यांना आरोपी बनवण्यात आले नसले तरी त्यांच्याविरोधात महत्त्वाचे तपशील हाती लागले असून त्याअनुषंगाने तपास केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी उच्च न्यायालयात मांडण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना संवेदनशील माहिती देवेंद्र फडणवीस नाही, तर नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये उघड केली होती असा दावा रश्मी शुक्ला यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली होती. त्यामुळे राज्यानेच अवमान केला आहे. आपल्याकडे कुठलीच कागदपत्रे नाहीत, असेही रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने काही फोन नंबरवर होणारं संभाषण टॅप करण्याची मंजुरी दिली होती, असं रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात सांगितलं होते. पोलीस दलातील बदल्या आणि पोस्टिंगच्या वेळी होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्याच्या तक्रारी तपासण्यासाठी ही परवानगी दिली होती, असे शुक्ला यांचे वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयात सांगितले. ‘रश्मी शुक्ला गुप्तवार्ता विभागाचं नेतृत्व करत होत्या. त्यावेळेस महाराष्ट्राच्या डीजीपींनी काही नंबरवर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले होते. ते नंबर राजकीय नेत्यांशी निगडीत मध्यस्थींचे होते. इच्छित स्थळी पोस्टिंग आणि बदलीसाठी त्यांच्याकडून मोठी रक्कम मागितली जात होती.’ असं वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयासमोर सांगितले होते.

दरम्यान, सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालावर विरोधकांनी टीका केली होती. “हा अहवाल सीताराम कुंटेंनी तयार केलाच नसेल, तो जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा”, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले होते. अशी शंका घेणं हा सीताराम कुंटेंचा अपमान असल्याची प्रतिक्रिया ट्वीट्सच्या माध्यमातून दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sensitive information revealed by nawab malik and jitendra awhad rashmi shukla claims abn

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या