मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणारे बिघाड आणि त्यामुळे प्रवाशांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी स्वतंत्र कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी ठाण्यात केली. ठाण्यातील रेल्वे प्रवाशांची त्यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहामुळे कोटय़वधी प्रवाशांची सेवा करण्यासाठी मी या मंत्रिपदाचा स्वीकार केला. मी जादूगार नाही, त्यामुळे माझ्याकडून जादूची अपेक्षा करूच नका, कामाची मात्र नक्की करा, असेही ते म्हणाले.
मुंबईची वाहतूक व्यवस्था जटिल परिस्थितीतून जात आहे. या परिस्थितीवर वरवर मलमपट्टी करून उपयोग नाही. आज लोकल गाडी उशिरा आली म्हणून आरडाओरड होत आहे. अशीच मलमपट्टी होत राहिली तर उद्या लोकल येईल किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली तर आश्चर्य वाटू नये, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातही स्वतंत्र रेल्वे मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी आलेले पैसे केरळ, आसाम किंवा इतर राज्यांत जाणार नाहीत, असा माझा प्रयत्न आहे. रेल्वेमार्गावर प्रवाशांचा भार कमी व्हावा, यासाठी आठवडय़ातून एक दिवस विभागवार पद्धतीने सुटी असावी, असा प्रस्ताव शासनापुढे ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे ते मुलुंड दरम्यान स्टेशन होऊ शकते. मात्र त्याबाबतची व्यवहार्यहता तपासून अहवाल देण्याचे आदेश प्रभू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.