माजी मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी ईडी चौकशी दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. सिताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप कुंटे यांनी केलाय. सक्तवसुली संचलनालयाने (ED) मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास करत असताना मागील वर्षी ७ डिसेंबरला सिताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला. यात कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या माहितीनुसार, “अनिल देशमुख गृहमंत्री असताना विशिष्ट पोलीस अधिकारी किंवा विशिष्ट पदांवरील बदल्यांची एक अनधिकृत यादी पाठवायचे. ते आपले खासगी सचिव संजीव पालंडे यांच्यामार्फत ही यादी पाठवायचे. ही यादी मला माझ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत मिळायची. मी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या विभागात काम करत असल्याने मी या यादीला नकार देऊ शकत नव्हतो.”

“बोर्डाच्या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्र्यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं”

“अनिल देशमुख यांनी पाठवलेली अनधिकृत बदलीची यादी पोलीस इस्टॅब्लिशमेंट बोर्डाच्या (PEB) सर्व सदस्यांना दाखवली जायची. या सर्व सदस्यांना यादी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पाठवल्याचं तोंडी सांगितलं जायचं. यानंतर ही यादी अंतिम आदेशात समाविष्ट केली जायची,” असंही सिताराम कुंटे यांनी सांगितलंय.

हेही वाचा : “अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”; शरद पवारांचा हल्लाबोल

नेमकं प्रकरण काय?

अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serious allegations of ex chief secretary sitaram kunte on anil deshmukh about police transfer pbs
First published on: 29-01-2022 at 10:26 IST