मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. न्यायालयाने ड्रग्ज प्रकरणात आपला निकाल देताना आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनचा जामीन अर्ज गेल्या अनेक दिवसांपासून पुढील तारखेपर्यंत पुढे ढकलला जात होता. आर्यनला बुधवारी जामीन मिळेल, अशी अपेक्षा होती, पण एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे. याबाबत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याची माहितीही नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

“इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत. मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल. भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार हे सर्व मिळून मुंबईमध्ये दहशत माजवत आहेत. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देण्यात येतील,” अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

“पूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा जेव्हा झाल्या आहेत त्या त्या वेळी जे संशयित सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. त्यानंतर त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नाहीत, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.