scorecardresearch

महसूल अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक अडचणी दूर?, विभागीय चौकशी सहा महिन्यांतच पूर्ण करण्याचे निश्चित

अधिकारी-कर्मचारी याची विभागीय चौकशी सहा महिने इतक्या कालावधीत पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे

mantralay
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : महसूल विभागातील सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींचा निपटारा कालबद्ध कार्यक्रम आखून केला जाणार आहे. यामुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या सर्व सेवाविषयक अडचणी दूर होणार आहेत. यासाठी १ सप्टेंबर ते ३१ ऑगस्ट निवडसूची वर्ष निर्धारित केले असून कोणत्याही अधिकारी-कर्मचारी याची विभागीय चौकशी सहा महिने इतक्या कालावधीत पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे.

राज्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा महसूल विभाग आहे. मात्र या विभागात काम करणाऱ्या अधिकारी- कर्मचारी यांच्या सेवाविषयक समस्या गुंता वाढलेला आहे. यावर तोडगा काढताना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी एक सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे.  निवडसूची वर्ष जाहीर करून दरवर्षी त्या कालावधीत पदोन्नती ते नियुक्ती या दरम्यानच्या सर्व सेवाविषयक प्रक्रिया एका विशिष्ठ वेळेत पूर्ण करण्याचा तक्ता प्रसिद्ध केला आहे. याचबरोबर विभागीय चौकशीच्या नावाखाली यापुढे वेळकाढुपणा चालणार नाही. कोणतीही विभागीय चौकशी केवळ सहा महिन्यांत पुर्ण करावी लागणार आहे. याचा महसूल विभागातील सर्व अधिकारीऱ्यांना फायदा होणार आहे.  पदोन्नतीसाठीच्या याद्या मागवणे, सेवा ज्येष्ठता याद्या तयार करणे, गोपनीय अहवाल मागवणे यांसारख्या सर्व बाबी एका कालबद्ध पद्धतीने पूर्ण केल्या जाणार आहेत. यात कोणाला चालढकल करता येणार नाही. अशा प्रकारे केलेल्या आखणीमुळे नियमित बदल्या करतेवेळी सुसूत्रता येणार आहे.

प्रादेशिक स्तरावर विशेष मोहीम राबवून ३० एप्रिल २०२३ पर्यंत पद नियमितीकरण. सेवा पुस्तिका अद्यायावत करणे, वेतन निश्चिती करणे आदी सेवाविषयक प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 05:56 IST