मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी गट–ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २१ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची मतमोजणी याच दिवशी होत असून आयोगाने अखेर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

नगरपालिका व नगर पंचायतींच्या २ आणि २० डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर सर्व मतमोजणी २१ डिसेंबरला घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने २ डिसेंबरला दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून परीक्षेसंदर्भात मागविलेल्या माहितीत अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे आणि मतमोजणी केंद्रे यांच्यातील अतिशय कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, संभाव्य वाहतूक कोंडी, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका आणि परीक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता या अडचणींचा उल्लेख करण्यात आला होता. महसूल विभागातील सर्व कर्मचारी मतमोजणीत व्यग्र असणार आहेत. त्यामुळे परीक्षा घेणे अशक्य असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. ही वस्तुस्थिती पाहता आयोगाने २१ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. आयोगाच्या पत्रानुसार, महाराष्ट्र गट–ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५ आता ४ जानेवारी २०२६ रोजी घेतली जाईल. तसेच महाराष्ट्र गट–क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – २०२५ ११ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

पीएसआय, एसटीआय आणि एएसओ या पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा एमपीएससीतर्फे घेतली जाते. यंदा एकूण ६७४ पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून, त्यात सहायक कक्ष अधिकारी ३, राज्य कर निरीक्षक २७९ आणि पोलिस उपनिरीक्षक ३९२ पदांचा समावेश आहे. सुरुवातीला ही परीक्षा ९ नोव्हेंबरला होणार होती. मात्र राज्यातील पूरस्थितीमुळे राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने संयुक्त पूर्वपरीक्षेच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आणि अखेर ती २१ डिसेंबरवर गेली. यानंतर आता नगरपालिका निवडणुकांवर न्यायालयीन स्थगितीचा पेच निर्माण झाल्याने निवडणुकीचा दुसरा टप्पा २० डिसेंबरला जाहीर करण्यात आला. त्यामुळे २ आणि २० डिसेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होऊन सर्व नगरपालिकांचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होणार की पुढे ढकलणार, असा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर आयोगाच्या निर्णयाने आता सुधारित तारखेनुसार तयारी करता येणार आहे. आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सर्व उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.