मुंबई : किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेले अपील सत्र न्यायालयाने गुरुवारी योग्य ठरवले. तसेच, राऊत यांची या प्रकरणातून पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.

मेधा सोमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी महानगरदंडाधिकाऱ्यांनी राऊत यांना दोषी ठरवून त्यांना १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तथापि, या शिक्षेला स्थगिती देऊन राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर, राऊत यांनी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर गेल्या आठवड्यात अंतिम युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. सत्र न्यायालयाने गुरुवारी या प्रकरणी निकाल देताना राऊत यांचे अपील योग्य ठरवले व त्यांची पुराव्यांअभावी बदनामीच्या आरोपांतून निर्दोष सुटका करत असल्याचे स्पष्ट केले.

तत्पूर्वी, अंतिम युक्तिवादादरम्यान, संबंधित लेख किंवा बातमीत मेधा यांची बदनामी केलेली नाही, असा दावा राऊत यांच्यातर्फे करण्यात आला. तर, राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे कोणताही घोटाळा झाला नसल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचा प्रतिदावा मेधा यांच्यातर्फे युक्तिवाद करताना केला गेला. पाच स्वयंसेवी संस्थांना २००५ मध्ये निविदाद्वारे काम देण्यात आले होते, त्यात सोमय्यांशी संबंधित एक संस्था होती आणि प्रकल्पाची एकूण किंमत २२ कोटी रुपये होती. त्यामुळे, १०० कोटी रुपयांचा घोटाळा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावाही मेधा यांच्यार्फे करण्यात आला.

प्रकरण काय ?

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात मेधा सोमय्या गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त १५ व १६ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी, हे वृत्त वाचून आपल्याला धक्का बसल्याचे म्हटले होते. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत.

सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने केल्याचा दावाही मेधा यांनी केला होता. त्याची दखल घेऊन २६ सप्टेंबर रोजी दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांची शिक्षा सुनावली. मात्र, निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्यासाठी राऊत यांना सुनावलेली शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित ठेवून त्यांना जामिनही मंजूर केला होता.