scorecardresearch

श्रीमंत मजूर प्रकरण : प्रवीण दरेकर अडचणीत? सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टात दाखल गुन्हा रद्द करण्याची आणि अटकेपासून दिलासा मागणारी याचिका दाखल केली होती.

Sessions court rejects Praveen Darekar bail application

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची अटकपूर्व जामीन याचिका सत्र न्यायालायने फेटाळली आहे. मुंबै बँक, ठेवीदार व सहकार विभागाचे मजूर असल्याचं भासवून फसवणूक केल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी प्रवीण दरेकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान कोर्टाने प्रवीण दरेकरांना अटकेपासून दिलेला दिलासा मंगळवारपर्यंत कायम ठेवला आहे.

प्रवीण दरेकर यांनी हायकोर्टात दाखल गुन्हा रद्द करण्याची आणि अटकेपासून दिलासा मागणारी याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका ऐकण्यास नकार दिला होता. यानंतर प्रवीण दरेकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सरकारी वकिलांनी अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने कोर्टाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला होता. दरम्यान सत्र न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली आहे. मात्र यावेळी हायकोर्टात निर्णयाला आव्हान देत यावे म्हणून अटकेपासून दिलेला दिलासा मंगळवारपर्यंत कायम ठेवला आहे.

माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दरेकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची आणि दरेकर यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली होती. मात्र दरेकर यांनी थेट उच्च न्यायालयात येण्यापूर्वी अन्य कायदेशीर पर्यायांचा अवलंब करावा, असे नमूद करून न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने दरेकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्याच वेळी दरेकर यांना अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्याची मुभा असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्या पाश्र्वभूमीवर दरेकर यांनी गुरुवारीच सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

दरेकर यांच्यावर फसवणूक, खोटी माहिती देणे, विश्वासघात, बनावट कागदपत्रे सादर करणे आदींप्रकरणी भारतीय दंड संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर हे बोगस ‘श्रीमंत’ मजूर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. आम आदमी पार्टीचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी दरेकरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरेकर यांच्यावर काय आरोप आहेत ?

दरेकर गेली २० वर्षे मजूर या प्रवर्गातून मुंबै बँकेवर निवडून येत होते. मात्र दरेकर हे मजूर नाहीत, अशी तक्रार आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. त्यानंतर विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांच्यावर नोटीस बजावली होती. त्यांना आपण मजूर कसे आहात हे सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र दरेकर यांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केली नाहीत. अखेर ३ जानेवारी २०२२ रोजी विभागीय सहनिबंधकांनी दरेकर यांना मजूर संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविले. त्यानंतर ‘आप’च्या धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत तक्रार दाखल केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sessions court rejects praveen darekar bail application abn

ताज्या बातम्या