मुंबई : विविध क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेला राज्यातील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातून आतापर्यंत ३ हजार ८७८ स्पर्धकांनी अर्ज केले आहेत. या स्पर्धेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियाना अंतर्गत केंद्रीय कौशल्य विभागामार्फत या बहुराज्यीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कृषी, आरोग्य, महिला सुरक्षा, नागरी विकास, पर्यावरण, संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि रोजगार क्षमता या क्षेत्रांतील समस्यांवर सर्जनशील व व्यवहार्य उपाय शोधणे हा स्पर्धेचा उद्देश आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नवोन्मेषक, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, उद्योग, सामाजिक संस्था आणि संशोधन संस्थांनाही यात सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नाही. केवळ शहरी भागातील युवकांचा या स्पर्धेत समावेश मर्यादीत न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार कौशल्य विकास विभागाने पुण्यातील सृजन ट्रस्ट आणि विज्ञान भारती कोकण प्रांत यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे.
या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धेचा प्रचार,प्रसार, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील युवकांना नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. इच्छुक स्पर्धकांना सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करता येईल. प्राथमिक नोंदणीनंतर पुढील टप्प्यात आधार संलग्न वैयक्तिक माहिती आणि प्रकल्पाची माहिती सादर करावी लागेल. अर्ज प्रक्रियेबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी संकेतस्थळावर चॅटबॉटची सुविधाही उपलब्ध आहे. अधिकाधिक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
