महानगरपालिकेकडून धोकादायक ठरवण्यात आलेली आणखी एक इमारत पडून सातजणांचा बळी गेला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सांताक्रूझ पूर्वेला सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली आली. या इमारतीवरील पाण्याची टाकी शेजारच्या चाळीवर पडल्याने वीस घरांची पडझड झाली आणि मृतांचा आकडाही वाढला.
सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार आवाज झाला व प्रचंड धुरळा उठला. आमच्या डोळ्यांसमोर बिल्डिंगवरील पाण्याची टाकी बाजूच्या घरांवर पडली व बाकीचा भाग सरळ खाली आला, असे घटनास्थळी असलेल्या गावडे यांनी सांगितले. ही इमारत धोकादायक असल्याने सर्व रहिवासी निघून गेले होते. मात्र तळमजल्याला लागून असलेल्या घरात संध्या श्रीधरन या त्यांच्या बहीण सुधा व भाऊ सत्यमसह राहत होत्या तर दुसऱ्या बाजूच्या घरात पांडे नामक व्यक्ती राहत होती. इमारत पडताना पांडे तसेच सत्यम घरातून बाहेर पडल्याने बचावले. संध्या कामानिमित्त बाहेर होत्या. सुधा श्रीधरन (३२) यांचा मृत्यू झाला.
अनिल पारधी यांची आई सुंदराबाई (६५), पत्नी राजश्री (३५), मुलगा आदित्य (१०) आणि आयुष (७) याचे मृतदेह संध्याकाळी उशिरा ढिगाऱ्याखालून बाहेर काढले गेले. या चौघांसह चंदन कांतिलाल पटेल (५०) यांनाही या दुर्घटनेत जीव गमावावा लागला. अक्षय केसरकर (२१), सिताबाई केसरकर (७०), रोहिणी जगताप (४०) आणि सत्यम श्रीधरन (३४) जखमी झाले.
(संग्रहित छायाचित्र)