देशातील पर्जन्य छायेच्या प्रदेशाचा नकाशा बदलत जात आहे. राज्याचा विचार केल्यास कोकणात येत्या काळात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाडय़ात मात्र पाऊस कमी होत जाणार आहे. यामुळे मराठवाडय़ात पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्यापेक्षा राज्य शासनाने वेळीच उपाययोजना आखून पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्याची गरज राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतील रेडिओ आणि वातावरण विज्ञान विभागाचे तज्ज्ञ राजेश अग्निहोत्री यांनी व्यक्त केली.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये ‘क्लायमेट चेंज अँड सोसायटी’ या विषयावर एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात देशातील हवामान बदलाचा परिणाम यावर चर्चा करण्यात आली. यावेळी अग्निहोत्री यांनी जास्त पाऊसही चांगला नाही किंवा कमी पाऊसही चांगला नाही. देशात काही भागांत पाऊस वाढताना दिसतो आहे तर काही भागांत कमी होताना दिसत आहे. यामुळे ज्या भागात साधनसामग्री उपलब्ध आहे तेथून साधनसामग्री उपलब्ध नसलेल्या भागात ती वळवण्यासाठी उपाययोजना करण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या चर्चासत्रात २०१३ मध्ये झालेल्या केदारनाथ येथील ढगफुटीवरही चर्चा रंगली. याबाबत लखनऊ विद्यापीठातील प्राध्यापक ध्रुवसेन सिंग यांनी स्पष्ट केले की, हिमालयात ढगफुटी ही सामान्य गोष्ट आहे. यापूर्वीही अनेकदा हिमालयात ढगफुटी झाली आहे. पण त्याकाळात इतकी लोकवस्ती नव्हती यामुळे फार चर्चा झाली नाही. हवामानातील बदलांसाठी केवळ मानवच कारणीभूत नसून ते नसíगकही आहेत, असा दावाही सिंग यांनी केला. मानवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीच्या अभ्यासातही पृथ्वीवरील वातावरणात अनेक बदल झाल्याचे समोर आले आहे. पण आता मानवनिर्मित साधनांचाही त्यावर परिणाम होत असल्यामुळे त्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. यामुळेच विज्ञानाच्या साह्याने निसर्गाचा समतोल राखत विकास करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी गोव्यातील अंटार्टिक आणि महासागर संशोधन केंद्राचे संचालक एस. राजन यांनी ध्रुवीय हवामानाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.