पालिका प्रशासनाचा दावा; विरोधकांकडून प्रशासन, शिवसेनेवर टीका

मुंबई महापालिकेतील ‘पारदर्शकते’चे पहारेकरी आणि विरोधी पक्ष काँग्रेस सातत्याने नालेसफाई होत नसल्यावरून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत आहे. असे असतानाही पालिका प्रशासनाने मुंबईमधील नालेसफाईची ९४.३१ टक्के कामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर प्रशासनाने पूर्व उपनगरांमध्ये १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला असून मुसळधार पाऊस पडल्यानंतरच प्रशासनाचा दावा कितपत खरा ठरतो हे स्पष्ट होऊ शकेल. मात्र नालेसफाईच्या दाव्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत गोंधळ उडण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमध्ये सुरू असलेली नालेसफाईची कामे ३१ मार्च रोजी पूर्ण झाली. मुंबईमध्ये ९४.३१ टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. शहरात ९३.७३ टक्के, पूर्व उपनगरात १०० टक्के, तर पश्चिम उपनगरात ९१.३० टक्के नालेसफाई झाल्याचे प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले.

प्रशासनाने जाहीर केलेल्या नालेसफाईच्या टक्केवारीबाबत भाजप आणि काँग्रेसने शंका उपस्थित केली आहे. मुंबईतील अनेक नाल्यांमध्ये गाळ पडून आहे, नाल्यातून उपसलेला गाळ काठावरून हलविण्यात आलेला नाही. असे असताना पूर्व उपनगरात १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. हा दावा मुसळधार पावसात फोल ठरण्याची चिन्हे आहेत, असे भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे.

भाजपचे नगरसेवक नाल्यांची पाहणी करीत असून नाल्यांमधील गाळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. असे असताना पूर्व उपनगरांमध्ये १०० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा प्रशासन कसा काय करू शकते, असा सवाल भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे.

कधीच १०० टक्के नालेसफाई होऊ शकत नाही, असे वक्तव्य करून काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी गोंधळ उडवून दिला होता. काही दिवसांपूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नालेसफाईची पाहणी केली होती. नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा त्यांनीही केला होता. या दोघांपैकी नेमके खरे कोण बोलत आहे, ते समजत नाही, असा सवाल मनोज कोटक यांनी केला.

नालेसफाई हा पोरखेळ होऊन बसला आहे. पूर्व उपनगरांमध्ये १०० टक्के नालेसफाई झाली असेल, तर पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबणार नाही याची शाश्वती प्रशासनाने मुंबईकरांना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

पालिका प्रशासन नालेसफाईची टक्केवारी जाहीर करून मुंबईकरांची फसवणूक करीत आहे. नाल्यांची परिस्थिती नेमकी काय आहे याची मुंबईकरांना कल्पना द्यावी आणि जे काही सत्य आहे ते उघड करावे.

रवी राजा, विरोधी पक्षनेते