मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास वेगात सुरू असून या चाळीतील अनेक रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे शिवडी बीडीडी चाळीतील ९६० रहिवासी मागील ३६ वर्षांपासूनपुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हा पुनर्विकास मार्गी लागताना दिसत नाही. पण आता मात्र केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आणि राज्य सरकारकडूनही पाठपुरावा सुरू असल्याने शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने शिवडी बीडीडी चाळीची जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यासाठीची रक्कम निश्चित केली आहे. ही रक्कम अंदाजे ४५० कोटी रुपये असून यावर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. यासंबंधीचा अंतिम निर्णय झाल्यास रखडलेला पुनर्विकास मार्गी लागणार आहे.

ब्रिटिशांनी बांधलेल्या वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि शिवडी बीडीडी चाळी जीर्ण झाल्या असून त्यांचा तातडीने पुनर्विकास करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळावर पुनर्विकासाची जबाबदारी सोपवली. मंडळाने ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास हाती घेतला असून याअंतर्गत १६ हजार रहिवाशांचे पुनर्वसन केले जात आहे. अंदाजे ३००० रहिवाशांचे ५०० चौरस फुटांच्या घराचे स्वप्न पूर्णही झाले आहे. तर सर्वच्या सर्व १६ हजार रहिवाशांचे पुनर्वसन २०३० पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. दुसरीकडे मात्र शिवडी बीडीडी चाळीतील १२ इमारती अजूनही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. या इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या झाल्या असून रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. शिवडी बीडीडी चाळीतील इमारती मुंबई बंदर प्राधिकरणाच्या जागेवर आहेत, त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे. ही जागा ताब्यात आल्यानंतरच राज्य सरकारला इमारतींचा पुनर्विकास करता येणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून शिवडी पुनर्विकासासाठी मान्यताच मिळत नसल्याने रहिवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पण आता मात्र या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुनर्विकास मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवडी बीडीडीची जागा राज्य सरकारकडे अर्थात म्हाडाकडे हस्तांतरित झाल्यानंतरच पुनर्विकास मार्गी लागणार आहे. त्यानुसार मुंबई बंदर प्राधिकरणाने आता जागा हस्तांतरित करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हस्तांतरणासाठी जागेच्या किमतीसह जी काही थकबाकी असेल ती अदा करून आम्ही जागा सरकारला वर्ग करण्यासाठी तयार असल्याची भूमिका बंदर प्राधिकरणाने घेतल्याची माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकारी अजय खत्री यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. केंद्र सरकारकडे झालेल्या चर्चेनुसार जागेची अंदाजे ३५० कोटी रुपये किंमत येत असून इतर थकबाकी ८०-९० कोटी रुपयांच्या घरात आहे. ही जागा ४५० कोटी रुपयांत हस्तांतरित करण्याची तयारी बंदर प्राधिकरणाची आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आता यावर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे. हा निर्णय झाल्यास शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास मार्गी लागेल आणि ९६० रहिवाशांना दिलासा मिळेल. दरम्यान, जागेच्या हस्तांतरण रकमेबाबत म्हाडाशी चर्चा झाली आहे का, याबाबत म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये याविषयी चर्चा सुरू असल्याचे बंदर प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आमच्या इमारती १०० वर्षांहून अधिक जुन्या असून पावसाळ्यात गळतीसह अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच इमारती जीर्ण असल्याने भीतीच्या सावटाखालीच राहावे लागते. दरम्यान, आमच्या चाळीचा पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी आम्ही मागील कित्येक वर्षांपासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. सर्व राजकीय पक्षांना साकडे घालत आहोत. यासाठी आंदोलनही केले. पण पुनर्विकासाची अजूनही प्रतीक्षाच आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असेल तर ती आमच्यासाठी दिलासादायक बाब आहे. आता यासंबंधीचा निर्णय तातडीने घ्यावा आणि प्रत्यक्ष पुनर्विकास मार्गी लावावा, हीच आमची अपेक्षा आहे. – मानसिंग राणे, रहिवासी, शिवडी बीडीडी चाळ