मुंबई : पदपथांवर पादचाऱ्यांना सुलभपणे मार्गक्रमण करता यावे, यासाठी महापालिकेकडून मुंबईत ‘पादचारी प्रथम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शिवडी परिसरातील डी. जी. महाजनी व जेरबाई वाडीया मार्गालगतच्या पदपथावर अडथळा निर्माण करणारी ७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, २ अनधिकृत कट्टे आणि २० फेरीवाल्यांवर गुरुवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून ”पेडेस्ट्रियन फर्स्ट” अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उपायुक्त प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने आणि एफ दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त वृषाली इंगुले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत शिवडी येथील डी. जी. महाजनी व जेरबाई वाडीया मार्गालगतचे पदपथ मोकळे करण्यात आले. याअंतर्गत, पदपथांवर उभारण्यात आलेली ७ अनधिकृत दुकाने, १५ तात्पुरते ताडपत्रीचे शेड, २ अनधिकृत कट्टे, ४ बेवारस साहित्य साठवण ठिकाणे आणि २० फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यावेळी, पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
दरम्यान, पादचाऱ्यांसाठी सुलभ पदपथ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे, पदपथांवर अडथळा निर्माण होईल, असे अनधिकृत बांधकाम करू नये किंवा साहित्य ठेवू नयेत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.
