कोळीवाड्यांचा शोध घेताना मांडवी, माझगाव कोळीवाड्यांचे अस्तित्त्व संपुष्टात आल्याचे दिसून आले. शिवडी कोळीवाड्याची गतही यापेक्षा वेगळी नाही. या कोळीवाड्याला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सामील करुन घेण्याची तयारी सध्या सुरु आहे. अर्थात कोळी समाजाचा तीव्र विरोध आहे. पण तो कितपत टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

मुंबई ज्या प्रमुख बेटांपासून उदयास आली, या बेटांभोवती असलेल्या किनाऱ्यांवर कोळी समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य होते. मासेमारी हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या या कोळी समाजाचे वास्तव्य ही धोक्यात आले आहे. इंग्रजांनी गोदीचे बांधकाम सुरु केले तसे कुलाबा वगळता त्या लगत असलेले दक्षिण मुंबईतील सर्वच कोळीवाडे नष्ट झाले. म्हणायला कोळीवाडे, प्रत्यक्षात काही बैठ्या आणि काही एक-दोन मजली चाळी असेच या कोळीवाड्याचे स्वरुप पाहायला मिळते.

मांडवी कोळीवाडा हा फक्त दोन सिमेंट चाळीत मर्यादित राहिला आहे तर माझगाव कोळीवाडा केवळ रस्त्याच्या नावामुळे अस्तित्त्व टिकवून आहे.(याच स्तंभात याआधी लिहिले आहे). या पार्श्वभूमीवर, शिवडी कोळीवाडाही फारसा वेगळा नाही. त्याची अवस्थाही त्याच दिशेने सुरु आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधकाम सुरु असलेली उत्तुंग इमारत या कोळीवाड्याला खेटून उभी राहिली आहे. याच योजनेत कोळीवाड्यातील घरांनाही झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत.

कोळीवाड्यातील काही गट त्याच दिशेने प्रयत्नशील आहेत. परंतु दोन ते अडीच हजार (काही घरे यापेक्षाही मोठी ) चौरस फुटांच्या वडिलोपोर्जित घरात राहणाऱ्या कोळी समाजाला ते मान्य नाही. तरीही सरकारी पातळीवरच काही राजकारणी मंडळीच दबाव आणत असल्यामुळे शिवडी कोळीवाडा मुंबईच्या नकाशावरुन पुसून गेला तर आश्चर्य वाटायला नको, अशी प्रतिक्रिया या कोळीवाड्यातील आद्य नागरिकांच्या पिढीतील डॅा. चंद्रकांत शिवडीकर देतात.

प्रत्यक्ष घटनास्थळी फिरताना याची पदोपदी जाणीव होते. हा पूर्वी कोळीवाडा होता का, असाही प्रश्न पडतो. उत्तुंग इमारती अद्याप या कोळीवाड्याभोवती आलेल्या नाहीत. परंतु तोही दिवस दूर नाही. समोर समुद्राचे दर्शन घडविणारे आलिशान फ्लॅट हवे आहेत. परंतु कोळीवाडा नको, अशीच भावना असल्याचे नव्या पिढीतील नितांशू पाटील हा तरुण सांगतो.

कुलाबा, मांडवी, माझगाव या सोबत शिवडी कोळीवाडा हा देखील समुद्राला खेटून होता. एका टोकाला झुलता ब्रिज तर दुसऱ्या बाजुला सिमेंट कारखाना आणि त्यात मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी असे एकेकाळचे स्वरुप होते. किनाऱ्यावर मासळी सुकविण्याची जागा होती. आता सारे कधीच नष्ट झाले आहे. झुलता ब्रिज ब्रिटिशांनी गोदीचे काम सुरु करताना पाडून टाकला तर सिमेंट कारखाना बंद अवस्थेत तेथेच आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या दगडी भिंतींमुळे समुद्र किनाराही आता कोळीवाड्यापासून झाकला गेला आहे. ‘कोळी समाज हॅाल’ हा फलक फक्त कोळीवाडा असल्याची खात्री पटवतो. अन्यथा शिवडी कोळीवाडा येथे आहे हे सांगण्याची वेळ रहिवाशांवर येते.

हार्बर रेल्वेच्या शिवडी स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फाटकातून बाहेर पडले की, पी डिमेलो रोड आणि त्यावरील मुक्त मार्ग (फ्री वे) ओलांडला की, हा कोळी समाज हॅाल दिसतो. या व्यतिरिक्त हा कोळीवाडा असल्याची कुठलीही चिन्हे आढळत नाहीत. गोदी बांधण्याचे ठरल्यानंतर कोळीवाडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी म्हणजे १९१९ मध्ये बॅाम्बे इम्प्रुव्हमेंट ट्रस्टमार्फत सरकारने शिवडी कोळीवाडा आणि दादर पूर्वेकडील फाईव्ह गार्डन अशा फक्त दोन ठिकाणी ९९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने भूखंड दिले.

शिवडी कोळीवाडा हा स्किम नंबर ५९ असा ओळखला जाऊ लागला. या अंतर्गत एकूण ३९ भूखंड निर्माण करण्यात आले. त्यापैकी २८ भूखंड शिवडी कोळीवाड्याच्या स्थलांतरासाठी देण्यात आले. १९६८ मध्ये पहिली दुमजली इमारत उभी राहिली. १९७५ पर्यंत कोळी समाजासाठी १६ इमारती उभ्या राहिल्या. १४ इमारती निवासी तर उर्वरित अनिवासी. या इमारतींमध्ये ९७ कोळी कुटुंबीयांचे स्थलांतर झाले. आणखी ५६ कोळी कुटुंबीयांसाठी इमारती निर्माण करावयाच्या होत्या. परंतु आजतागायत महापालिकेने त्यासाठी परवानगी दिली नाही.

मात्र त्यानंतर झालेल्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी मात्र पालिकेने तात्काळ ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले. कोळी समाजासाठी दिलेल्या भूखंडावर रहिवाशांनी घरे बांधली. या घरांची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी परवानगी मिळत नसल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे. दुसरीकडे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे, असा आरोप डॅा. शिवडीकर यांनी केला. मोकळा भूखंड हस्तांतरण (वेकंट लॅंड ट्रान्सफर – व्हिएलटी) दाखवून कोळी समाजाला झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत ढकलण्याचा प्रयत्न सुरु आहे.

अर्थात तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते ठामपणे सांगतात. ९९९ वर्षांचा भाडेपट्टा असताना महापालिका आमच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना कशी लादू शकते, असा सवालही ते करतात.२०१८ मध्ये शिवडी कोळीवाड्याचे सीमांकन झाले. परंतु तो अहवाल उपलब्ध करुन दिला जात नाही. सीमांकन झाल्यानंतर कोळीवाड्यांसाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली आणली जाणार आहे, असे शासन सांगत आहे तर दुसरीकडे हा कोळीवाडा झोपडपट्टी दाखवून आता गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे, अशी भीती शिवडी कोळीवाड्यातील रहिवासी व्यक्त करीत आहेत. शिवडी कोळीवाड्याचा परिसर सीमांकनात ३२ हजार ३७८ चौरस मीटर नोंदला गेला आहे. या पैकी दोन हजार ६४ चौरस मीटर भूखंडावर मुंबई पोर्ट ट्रस्टने तर उर्वरित भूखंडावर महापालिकेने दावा केला आहे. मग आम्हाला ९९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिलेल्या भूखंडाचे काय, असा सवाल हे कोळी बांधव करीत आहेत.

आमची घरे १९५० पूर्वीची आहेत. त्यामुळे चार इतक्या चटईक्षेत्रफळाचा लाभ मिळू शकणार आहे. आमची सध्या जितक्या क्षेत्रफळाची घरे आहेत, तितक्या आकाराची घरे पुनर्वसनात मिळावी अथवा आम्हाला आहे त्याच ठिकाणी छोटी घरे बांधण्याची परवानगी द्यावी, अशी या कोळी समाजाची मागणी आहे. कोळीवाड्याचे अस्तित्त्व संपुष्टात आले आहेच. परंतु किमान आम्हाला झोपडवासीयांसाठी असलेले धोरण लागू करु नका. आम्हाला आमचं अस्तित्त्व जपू द्या. कधीकाळी येथे शिवडी कोळीवाडा होता, याच्या आठवणी राखण्याची संधी द्या, अशी मागणी हे रहिवाशी करीत आहेत. परंतु शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत त्यांना आहे.

कोळीवाडे-गावठाणे महसूल विभागाच्या अखत्यारित आणा…

मुंबईत कोणताही विकास हा भूमिपुत्रांच्या म्हणजे कोळी, आगरी समाजाच्या मुळावर सर्वप्रथम येतो. आधुनिक मुंबईच्या विकासात या समाजाचे मोठे योगदान आहे. जवळपास सर्वच सरकारी प्रकल्पांसाठी या समाजांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईकरांना विकासाची रसाळ फळे चाखायला मिळत आहेत. मात्र सरकारी यंत्रणांनी किती ओरबाडायचे याला काही सुमार राहिलेला नाही. विविध कोळीवाड्यांमधील जमिनींवर सांगितलेला हक्क हे जमिनी लाटण्याचे या पुढचे पाऊल आहे. कोळीवाड्यांतील रहिवाशांना आपल्या जमिनींवर एखादा पुनर्विकास किंवा अन्य काही प्रकल्प राबवायचा असल्यास येत्या काळात विविध प्राधिकरणे आड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जमिनी महसूल विभागाच्या अखत्यारीत आणण्याची मागणी या कोळी समाजाने केली आहे.

अटल सेतुचा असाही फटका…

शिवडी जेट्टी आणि शिवडी खाडी हा परिसर दरवर्षी हिवाळ्यात हजारो ‘रोहित’ (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आश्रयस्थान बनत होते. हे सुंदर गुलाबी पक्षी मुख्यत्वे ऑक्टोबर ते मे दरम्यान गुजरातच्या कच्छच्या रणातून येथे येतात. शिवडीच्या दलदलीच्या भागात मुबलक प्रमाणात असणारे शेवाळ हे त्यांचे मुख्य खाद्य. मात्र अटल सेतू ( शिवडी ते न्हावा शेवा) बांधल्यानंतर या पक्षांच्या आगमनावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगितले जाते.

शिवडी किल्ला …

शिवडी खाडी आणि शिवडी कोळीवाडा यांना जोडणारा हा किल्ला खडकाळ टेकडीवर आहे. बाहेरच्या बाजूस एक तटबंदी व आतमध्ये एक तटबंदी असलेला हा किल्ला साधारण १६८० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईच्या बंदराचे संरक्षण करण्यासाठी बांधला होता. पाच शतकांचे उन्हाळे-पावसाळे अंगावर घेतलेला हा किल्ला आजही भक्कम स्थितीत आहे. किल्ला पुरातत्व खात्याच्या, किल्ल्याचा खालचा भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट तर शिवडीकडून येणारा रस्ता पालिकेच्या अखत्यारीत आहे. गेल्या काही वर्षांपासून किल्ल्याच्या डागडुजीचा प्रस्ताव पालिकेकडे असून त्यास आता मूर्त रूप मिळाले आहे.