मुंबई : शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पातील प्रभादेवी दुमजली पुलाच्या बांधकामातील शेवटचा अडथळाही आता लवकरच दूर करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावले उचलली आहेत. पुलाच्या कामासाठी बाधित होणाऱ्या लक्ष्मी निवास इमारतीचे पाडकाम केल्यानंतर आता हाजी नूरानी इमारत रिकामी करून घेण्यासाठी एमएमआरडीएकडून रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिशीनुसार रहिवाशांना शुक्रवारपर्यंत घर रिकामे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुदतीत घरे रिकामी न केल्यास सोमवारपासून निष्कासनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. रहिवाशांनी मात्र काही अडचणी असल्याचे सांगत महिन्याभराची मुदत मागितली असून तूर्तास घरे रिकामी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे यावरून वाद होण्याची शक्यता आहे.
दोन इमारती बाधित
दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद पोहोचता यावे यासाठी शिवडी – वरळी उन्नत रस्ता बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तो आतापर्यंत सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, भूसंपादनातील अडथळे यामुळे या प्रकल्पास विलंब झाला आहे. पण आता मात्र सप्टेंबर २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार या प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या प्रभादेवी दुमजली पुलाच्या कामाला वेग दिला आहे. या पुलाच्या खांबासाठी प्रभादेवीतील हाजी नूरानी आणि लक्ष्मी निवास इमारत पाडावी लागणार आहे. या इमारतीतील रहिवाशांसाठी म्हाडाकडून ८३ घरे खरेदी करून यांचे वितरण रहिवाशांना करण्यात आले आहे. रहिवाशांना म्हाडाची घरे वितरित केल्यानंतर हाजी नूरानी आणि लक्ष्मी निवासचे पाडकाम करून खांबांच्या कामाला गती देणे गरजेचे आहे. पण अजूनही हाजी नूरानी इमारत रिकामी झाली नसल्याने एमएमआरडीएची अडचण वाढली आहे. लक्ष्मी निवासचे पाडकाम पूर्ण झाले आहे. तर आता हाजी नूरानी इमारत पूर्णतः रिकामी करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीएने ठोस पावले उचलली आहेत.
यासाठी हवी महिन्याभराची मुदतवाढ
हाजी नूरानी इमारतीतील काही रहिवाशांनी अद्याप घरे रिकामी केलेली नाहीत. त्यामुळे मंगळवार, २१ एप्रिल रोजी रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिशीनुसार शुक्रवार, २४ एप्रिलपर्यंत घरे रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर शुक्रवारी घरे रिकामी न केल्यास सोमवार, २७ एप्रिल रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा एमएमआरडीएने नोटिशीद्वारे रहिवाशांना दिला आहे. रहिवाशांनी मात्र यावर आक्षेप घेतला आहे. म्हाडाच्या घरांमध्ये गळतीसह काही समस्या आहेत. तसेच वाढीव क्षेत्रफळासाठी रहिवाशांना रक्कमेची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यासाठीही वेळ हवा आहे. त्यामुळे थोडा वेळ द्यावा आणि घरांची योग्य ती दुरुस्ती करून द्यावी. मे अखेरीस आम्ही घरे रिकामी करू. त्यामुळे महिन्याभराची मुदत आम्हाला द्यावी, अशी मागणी एमएमआरडीएकडे करण्यात आल्याची माहिती हाजी नूरानी इमारतीतील रहिवासी मुनाफ ठाकूर यांनी दिली. आता एमएमआरडीए यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
