मुंबई: दक्षिण मुंबईतून अटल सेतूवर अतिजलद पोहचता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत रस्ता बांधला जात आहे. आता या उन्नत रस्त्यातील दोन इमारतींच्या पुनर्वसनाचा मोठा अडथळा अखेर दूर झाला आहे. त्यामुळे आता प्रकल्पाच्या कामाला वेग मिळणार आहे. प्रभादेवी येथील दुमजली उड्डाणपुलासाठी लगतच्या दोन इमारती पाडाव्या लागणार असून तेथील रहिवाशांचा विस्थापनास विरोध होता. मात्र आता हा प्रश्न मार्गी लागला आहे. ८३ पैकी पाच रहिवाशांनी एमएमआरडीएच्या धोरणानुसार घराच्या मोबदल्यात नुकसान भरपाईची रक्कम घेतली आहे. तर आतापर्यंत ३० रहिवाशांना म्हाडाच्या घरांचा ताबा देण्यात आला असून उर्वरित रहिवाशांना घरांचे वितरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

अटल सेतूला जोडणारा शिवडी-वरळी उन्नत रस्ता आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि १९ इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने प्रकल्प रखडला आहे. हा रस्ता रेल्वे मार्ग ओलांडून १२५ वर्षांहून अधिक जुन्या प्रभादेवी पुलावरुन जाणार होता. मात्र प्रभादेवी पूल जुना झाल्याने त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. त्यामुळे पुनर्बांधणीची जबाबदारी स्वीकारत एमएमआरडीएने प्रभादेवी पूल पाडून त्याजागी दुमजली पूल बांधण्याचा निर्णय घेतला.

पुलाच्या खालील स्तरावरुन आता ज्याप्रमाणे वाहने धावतात त्याप्रमाणे वाहने जातील. वरील स्तरावरुन दक्षिण मुंबईवरुन येणाऱ्या वाहनांना अटल सेतूकडे जाता येईल. मात्र या दुमजली पुलासाठी तेथील १९ इमारती विस्थापित कराव्या लागणार होत्या. त्यास रहिवाशांचा विरोध होता. त्यामुळे एमएमआरडीएने पुलाच्या रचनेत बदल करून १७ इमारतींचे विस्थापन रोखले. तर केवळ दोन इमारतीचे विस्थापन करणे आवश्यक झाले. मात्र या दोन इमारतीतील रहिवाशांचाही विस्थापनास विरोध होता. प्रकल्पाविरोधात रहिवाशांनी जनआंदोलन केले. त्यामुळे प्रभादेवी पुलाचे पाडकाम करून दुमजली पुलाचे काम सुरु करण्यास विलंब झाला. पण आता मात्र विस्थापनाचा-पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास इमारतीतील ८३ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाला पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या घरांपैकी ८३ घरांची मागणी एमएमआरडीएने मंडळाकडे केली होती. त्यानुसार प्रभादेवी, दादर, माहीम परिसरातील घरे शोधून काढत त्याची रक्कम मंडळाने एमएमआरडीएला कळवली होती. ८३ पैकी पाच रहिवाशांनी एमएमआरडीएच्या धोरणानुसार घराची रक्कम नुकसान भरपाई म्हणून स्वीकारली. त्यामुळे एमएमआरडीएने ७८ घरे मंडळाकडून विकत घेतली आणि त्यासाठी अंदाजे ९० कोटी रुपये मोजले.

ही घरे एमएमआरडीएच्या ताब्यात आली असून एमएमआरडीएने आतापर्यंत ३० रहिवाशांना घरे वितरीत केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकार्याने दिली. उर्वरित रहिवाशांना घरे देण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच ती पूर्ण होईल असेही सांगितले. आता लवकरच या दोन इमारती रिकाम्या होतील आणि त्यानंतर त्यांचे पाडकाम करून उन्नत रस्त्याच्या कामाला वेग दिला जाईल. उन्नत रस्ता वेळेत पूर्ण होईल असा विश्वास यानिमित्ताने एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.