माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर मंगळवारी एका २१ वर्षीय तरुणाची भोसकून हत्या करण्यात आल्यानंतर दोन दिवसांची म्हणजेच बुधवारी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात नागपूरमधून दोघांना अटक केलीय. या हल्ल्यामध्ये या तरुणाची १९ वर्षीय प्रेयसी सुद्धा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या हल्ल्यामागे सेक्सटॉर्शनचं (अश्लील साहित्य प्रसारित करण्याची धमकी देत खंडणी मागणे) कारण असल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यक्तीचा अश्लील व्हिडीओ मयत व्यक्तीच्या हाती लागला होता. त्यावरुन तो पैशांची मागणी करत असल्यानेच हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय.
या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद वसीम शेख असं आहे. मोहम्मदच्या हाती काही अश्लील व्हिडीओ लागलेले. त्या व्हिडीओंच्या आधारे तो काही व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. याच मुद्द्यावरुन त्याच्यावर हल्ला करण्यात आला ज्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय. या हल्ल्यामध्ये मोहम्मदची प्रेयसीवरही वार करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र या सेक्सटॉर्शनच्या प्रकरणाशी तिचा काहीच संबंध नसल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय.
माहिम पोलिसांनी नागपूरमधून या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी या दोघांना मुंबईत आणण्यात आलं असून दोघांपैकी एकाचीच ओळख पटलीय. अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीचं नाव कमरान ऊर्फ कम्मू असं असल्याची माहिती माहिम पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.
गोवंडी येथे राहणारा शेख आणि त्याची प्रेयसी माहिमच्या समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले असता मंगळवारी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. नंतर पोलीस तपासामध्ये या दोन्ही व्यक्ती गोवंडीमधील रहिवाशी असल्याची माहिती समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
अश्लील व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणावरुन शेखवर जीवघेणा हल्ला झाला असला तरी यासंदर्भातील कोणतीही पूर्वकल्पना त्याच्या प्रेयसीला नव्हती अशी माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिलीय. हल्लेखोर हा शेखच्या ओळखीचा होता. गोवंडीमध्ये शेख आणि आरोपी एकाच परिसरामध्ये राहत होते. शेखला एका व्यक्तीचे काही अश्लील व्हिडीओ मिळाले होते. त्याचा वापर करुन तो त्या व्यक्तीकडून पैशांची मागणी करत होता. याच मुद्द्यावरुन शेख आणि आरोपीमध्ये आधी माहिम समुद्रकिनारी बाचाबाची झाली. त्यानंतर वाद टोकाला गेल्यानंतर शेखवर हल्ला करण्यात आला.
“शेखच्या प्रेयसीला याबद्दल काहीच माहिती नव्हती,” असं पोलीस म्हणाले आहेत. या मुलीची ओळख पोलिसांनी जाहीर केलेली नाही. शेखच्या प्रेयसीवरही चाकूने हल्ला करण्यात आला असून तिच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलंय. ही तरुणी घडलेल्या सर्व घटनाक्रमाची साक्षीदार असून तिने दिलेल्या माहितीचा पोलीस तपासात मोठा फायदा होणार आहे. मात्र सध्या ही तरुणी काहीही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. या मुलीला जबाब नोंदवण्याइतपत बरं होण्यासाठी किमान पाच दिवसांचा वेळ लागेल असं डॉक्टरांनी कळवल्याची माहिती पोलिसांनि दीलीय.
माहिम दर्ग्यामध्यचे जाऊन हे दोघे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. येथील टेट्रापॉड्सवर बराच वेळ बसल्यानंतर तेथे काहीजण आले आणि आमच्यावर हल्ला करुन लागले. शेखने जाब विचारला असता त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. माझ्यावरही चाकूने हल्ला करण्यात आला, असा जबाब या मुलीने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोलिसांकडे नोंदवला होता. या मुलीने स्वत: टॅक्सी करुन रुग्णालय गाठलं तर. शेखला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी समुद्रकिनारी आढळून आला.
या प्रकरणात माहिम पोलिसांनी खून आणि खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले आहेत.